जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) अक्षय तृतीयेला भेंडवडच्या मांडण्यात येणाऱ्या पारंपारीक घटमांडणीच्या भविष्यवाणीची विदर्भात चर्चा असते.आज 30 एप्रीलच्या संध्याकाळी ही घटमांडणी होईल तर 1 मे रोजी सकाळी घटांचे निरीक्षण करून भविष्यवाणी केली जाईल.परंतू भेंडवडची भविष्यवाणी नेमकी कशी करतात? त्यामध्ये खरंच किती तथ्यं आहे? याची उत्सुकता असते. तर जाणून घेवूया या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
तब्बल 350 वर्षापासून पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भेंडवड गावातील घट मांडणीची परंपरा कायम आहे. या परंपरेची चंद्रभान महाराज यांनी मुहूर्तमेढ रोवली होती.सध्या ही परंपरा वंशज पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज पुढे नेत आहेत.भेंडवडच्या भविष्यवाणीत शेती,राजकीय व सामाजिक घडामोडींचा अंदाज घेतला जातो. त्यामुळे केलेल्या भाकिताची संपूर्ण विदर्भात उत्सुकता लागून असते. वाघ घराण्याचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ भेंडवडची भविष्यवाणी उद्या जाहीर करतील. या भेंडवडच्या भविष्यवाणीबद्दल सारंगधर महाराज सांगतात, “आम्ही सांगत असलेलं भाकीत 70 ते 75 टक्के खरं ठरते. गेल्या 20 ते 25 वर्षांपासूनचा तसा रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध आहे.”
पण भेंडवडच्या भाकिताला वैज्ञानिक आधार नाही अशी टीका होते. यावर महाराज सांगतात की, “आमच्या भविष्यवाणीला वैज्ञानिक आधार नसेलही पण नैसर्गिक आधार आहे. कारण निसर्गातल्या घडामोडींवरूनच आम्ही भाकीत सांगतो. हवामान खातं जसे हवामानाचा अंदाज व्यक्त करते तसेच आम्हीही अंदाजच व्यक्त करतो. याबाबत कुणीच एकदम अचूक असू शकत नाही.”
▪️ अशी होते घटमांडणी!
राज्याच्या कानाकोपऱ्यातून भेंडवड गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आपल्या पुढील शेतीच्या पिका-पाण्याच्या नियोजनाकरता या घटमांडणीला येत असतात. शेतात मातीचा एक भला मोठा घट तयार करण्यात येतो. त्यामध्ये अंबाडी, गहू, ज्वारी, तूर, उडिद, मूग, कपाशी, करडई, हरभरा, जवस, भादली, तांदूळ, वाटाणा, मसूर, बाजरी इत्यादी १८ प्रकारची धान्य ठेवण्यात येतात. त्याचबरोबर गटाच्या मधोमध एक खड्डा खोदण्यात येतो. त्यामध्ये चार ढेकळे ठेवून त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात येते. घागरीवर पुरी, सांडोळी, कुरडई, पापड, भजी, वडे आदी खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात.
अशाप्रकारे घटमांडणी केल्यानंतर पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज त्यांच्या अनुयायासह दुसऱ्या दिवशी परततात.रात्रीच्या वेळी या शेतात कुणीही फिरकत नाही. त्यामुळे रात्रीदरम्यान या घटांमध्ये जे काही बदल घडतात. त्यावरून भाकीत वर्तविण्यात येते.














