भादोला (हॅलो बुलडाणा) रस्ते म्हणजे विकास वाहिन्या! मात्र रस्ते काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड नेहमीच कानावर पडत असते. खामगाव ते बुलढाणा हा रस्ता पारदर्शी व्हावा यासाठी मंत्री महोदय नितीन गडकरी यांनी 247 कोटी रुपये मंजूर केले. निर्धारित कालावधीत हा रस्ता अजुनही पूर्ण झाला नाही, रस्त्यावर पुरेसे डांबर नाही. त्यामुळे या रस्त्यावरील डांबर कोणी खाल्ले? असा प्रश्न उपस्थित होत असून, ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमतातून रस्त्याच्या कामाची पुरती वाट लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
बुलढाणा ते खामगाव या मार्गावरील भादोला येथील नॅशनल हायवे चे काम सुरू आहे. मात्र रस्त्याचे 2 इंची देखील डांबीकरण केले नसल्याचा आरोप येथील रहिवासी दीपक जवंजाळ यांनी केला आहे. ते म्हणाले की, एक इंची डांबरीकरणाचे काम करण्यात आले असून, हा रस्ता उखडत आहे. पुढे 2 महिन्यानंतर पावसाळा सुरू झाल्यास या रस्त्याचे काय हाल होतील हे न सांगितलेलेच बरे! संबंधित ठेकेदार व सुपरवायझर यांना या रस्ता कामाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचे जवंजाळ म्हणाले. भादोला येथे पूलाची निर्मिती होणार असल्याचे एका युवकाने सांगितले असून पूल निर्मिती न करता केवळ बोगस डांबरीकरणाचे काम करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.खामगाव ते बुलढाणा या रस्त्यासाठी ना. नितीन गडकरी यांनी 247 कोटी रुपये मंजूर केले आहे.परंतु ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्या संगणमताने रस्त्याची वाट लावण्याचे काम सुरू आहे.हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, येथे अनेक अपघाताच्या घटना घडल्यात. अनेकांना अपंगत्व आले आहे.त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून रस्त्यांचे उत्कृष्ट काम व्हावे,अशी मागणी जोर धरू लागली आहे.