डोणगाव (हॅलो बुलडाणा/ अनिल राठोड) जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या डोणगाव गावात (लोकसंख्या २५ ते ३० हजार) कायदा व सुव्यवस्थेचा खोळंबा स्पष्टपणे दिसून येतोय. गावातील सहज किराणा दुकाने, ऑटोमोबाईल्स दुकाने, चहा टपऱ्यांवर खुलेआम पेट्रोलच्या बाटल्या विकल्या जात आहेत. चौक, राजगड गल्ली, श्रीकांत टॉकीज रोड, गजानन महाराज मंदिराजवळ, आरेगाव रोड परिसरात अवैध गॅस सिलेंडर आणि पेट्रोल जास्त दराने विक्री होत असून गावात जणू धोक्याचा स्फोटक साठा तयार केला जात आहे.
यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. नियमांचे सर्रास उल्लंघन करून काही व्यापारी गॅस सिलेंडर काळ्या बाजारात विकून अक्षरशः गावाच्या जिवाशी खेळत आहेत. एवढे सर्व काही खुलेआम सुरू असतानाही संबंधित यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. प्रशासनाचा हा सुस्त कारभार हाच सर्वाधिक चिंतेचा विषय बनला आहे. डोणगावमध्ये वाढत्या अवैध व्यवहारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून तातडीने कारवाईची मागणी केली जात आहे.