बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आईपेक्षा या जगात कुणीही शक्तीशाली नाही.आपल्या मूलासाठी एक आई सगळ्या जगासोबत लढायची ताकद सदैव मनात ठेवत असते. त्यामुळेच ईश्वरापेक्षाही अधिक दर्जा हा आईला दिला जातो.मुलाला ‘आयएएस’ करण्यासाठी जिवाच रान करणाऱ्या अशाच अद्भुत शक्तीचे दर्शन बुलढाणा चिखलीच्या रस्त्यावर झाले आहे.रिजवाना शेख अशा या मातृशक्तीचे नाव असून,या मातेला खरंच सॅल्यूट ठोकला पाहिजे!
मुंबई पुण्या सारख्या मेट्रो शहरात महिला ऑटो रिक्षा चालविताना दिसतात मात्र बुलढाणासारख्या शहरात असे उदाहरण आदर्शवत आहे. रिजवाना शेख ह्या उपजीविकेसाठीच नव्हे तर आपल्या मुलाचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी रस्त्यावर ऑटोरिक्षा चालक म्हणून काम करताहेत.
त्यांनी मुलाला IAS करण्याचे ध्येय उराशी बाळगलेय. आतापर्यंत कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी बरीच कामे केली.मात्र महागाईच्या काळात घर खर्चही भागत नसल्याने मूलाच्या शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकला. मूलाला चांगल्या शाळेत शिकवावे आणि चांगल्या शाळेत ऍडमिशन घ्यायची म्हटली म्हणजे लाखो रुपये डोनेशन लागते हे रिजवाना शेख यांना कळून चुकले होते. वाढत्या महागाईत पतीचा पगार पुरत नाही
म्हणून त्यांनी ऑटो चालवण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या रिक्षाची चाकं फिरताहेत.. मुलाच्या शाळेची फी भरताहेत. ऑटो रिक्षा चालवताना चांगले वाईट सगळेच अनुभव येतात मात्र रिजवाना ताई कशालाच घाबरत नाहीत. परिस्थितीश दोन हात करत त्या ताठ मानेने हा व्यवसाय करतात… त्यांच्या समाजाचे आणि पतीचे मोठं पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांच्या मुलासाठी त्या ‘सुपरमॉम’ ठरत असून ही या मातृशक्तीची धडपड प्रेरणादायी ठरणारी आहे.