बुलढाणा (हॅलो बुलडाणा) काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाला जिल्ह्यातच विरोधाचा सूर उठला आहे. घाटाखालील काँग्रेसचे युवा नेते अॅड. गणेशसिंग राजपूत यांनी आपल्या बंधू अॅड. विजयसिंग राजपूत आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत आज (6 मार्च) संध्याकाळी मुंबईत हा प्रवेश होणार आहे.या घडामोडींमागे आमदार संजय गायकवाड यांच्या राजकीय रणनीतीचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच विजय अंभोरे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असून, तेही शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत. सोशल मीडियावर “दांडा तोच, झेंडा नवा! जय महाराष्ट्र!” अशी पोस्ट करून राजपूत बंधूंनी आपल्या भूमिकेचा इशारा दिला होता.
अॅड. गणेशसिंग राजपूत हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस समन्वयक होते. मात्र, आता त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आमदार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे जिल्ह्यात काँग्रेससाठी मोठे संकट निर्माण झाले असून, पक्षातील अंतर्गत बंडखोरी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.