बुलढाणा (हॅलो बुलडाणा) निर्दोष रस्त्यावर मरतात..गुन्हेगार मोकाट फिरतात हे अन्यायाचे राज्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत, बीड हत्या प्रकरणी व बुलढाण्यातील त्रिशरण चौकातील वेदनादायी अपघाता प्रकरणी न्यायिक मागणीसाठी १० मार्चला भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात येऊन बुलढाणा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता जिजामाता प्रेक्षागार ते जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा पर्यंत हा मोर्चा काढण्यात येईल.या मोर्चात नागरिकांनी सामील होण्याचे आवाहन धर्मवीर युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच सर्व राजकीय पक्ष, संघटना यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोषभैय्या देशमुख यांची झालेली निर्घुण हत्या हा केवळ एक गुन्हा नाही, तर माणुसकीवरचा मोठा डाग आहे. ज्यांनी गावाच्या हितासाठी, जनतेच्या भल्यासाठी स्वतःचं आयुष्य झोकून दिलं, त्यांनाच निर्दयपणे संपवलं जाणं हे खूप क्रूर आहे.
एकेकाळी वाल्मिक कराड या गुंडाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने बीडमध्ये दहशतीचं साम्राज्य उभं केलं, सामान्य नागरिकांपासून ग्रामसेवक, सरपंच,नगरसेवकांपर्यंत सर्वांना धाकात ठेवलं. अखेर त्याच्या अमानुष प्रवृत्तीचा बळी स्व. संतोष देशमुख झाले. या भ्याड कृत्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे काढण्यात येत आहे.
धर्मवीर युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच सर्व राजकीय पक्ष संघटनांच्यावतीने १० मार्च रोजी बुलढाणा बंदचे आवाहन करण्यात येत आहे. स्व.कु स्नेहल संदीप चौधरी हीचे बुलढाणा शहरातील त्रिशरण चौकामध्ये वेदनादायी अपघातात मृत्यू झाला.तिच्या निधनानंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी व “वाल्मिक कराडसह इतर सर्व आरोपींना भर चौकात अतिक्रुर शिक्षा द्या” अशी मागणी राज्यसरकारकडे करण्यासाठी तसेच गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांवर तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना कठोरात कठोर शिक्षेची मागणी करण्यात येणार आहे.