जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये गेल्या १५ दिवसांपासून डिंक तस्करांकडून जंगल पेटवण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या मानवनिर्मित वणव्यांमुळे लाखोंची वनसंपत्ती भस्मसात होत असून, अनेक वन्यप्राण्यांचे जिवंत जळून मृत्यू होत आहे. मात्र, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या नष्टसत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.सालयच्या डिंकाला मोठी मागणी असल्याने तस्करांकडून आदीवासींकडून हा डिंक मोठ्या प्रमाणात जमा केला जातो. उष्णतेमुळे झाडांचा अधिक डिंक निघतो, म्हणूनच डिंक माफिया सातपुडा पर्वताला आग लावत आहेत. या आगीमुळे हिंस्र प्राणीही स्थलांतर करतात, त्यामुळे त्यांचा धोका राहात नाही आणि तस्करांना मोकळे रान मिळते.
डिंकाच्या तस्करीसह सातपुड्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि अतिक्रमण सुरू आहे. जामोद राऊंडमधील जंगलात हे प्रकार खुलेआम सुरू असून वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी हप्ते उकळण्यात मग्न आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोनबर्डीजवळील साताशिवा बेंड परिसरात भीषण वणवे पेटले आहेत. मात्र, वनविभाग पूर्णपणे गप्प आहे! सातपुडा वाचवण्यासाठी तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.