चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) शहरात गेल्या काही काळात वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त होते. अखेर, चिखली पोलिसांनी ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई करत तब्बल २.८६ लाख रुपये किंमतीचे २१ हरवलेले मोबाईल हस्तगत केले.
पोलीस अंमलदार विजय किटे, सुनिल राजपूत आणि महिला पोलीस रुपाली उगले यांच्या विशेष पथकाने गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे विविध ठिकाणांहून हे मोबाईल हस्तगत केले. यात Oppo, Samsung, Moto, Realme, Vivo, OnePlus, Redmi यांसारख्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक वि.चि. महामुणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
चिखली पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले असून, भविष्यातही अशाच प्रकारे कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.