येळगाव (हॅलो बुलडाणा) मागील पंधरा-वीस दिवसांपासून रात्रीच्या वेळी एक महिला गावात फिरत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ही महिला ज्या घरासमोर थांबते, तिथेच आंघोळ करून साडी, लिंब, मिरच्या, हळद-कुंकू ठेवते आणि क्षणात गायब होते! या विचित्र घटनांमुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण आहे.
पहिली घटना – भयभीत कुटुंब!
गावातील एका महिलेने सांगितले की, मध्यरात्री एक वाजता घराच्या दाराजवळ कोणीतरी असल्याचा आवाज आला. ती उठून पाहते तोच शेजाऱ्यांनी आवाज दिला – समोर एक स्त्री दिसत होती, पण क्षणात गायब झाली! तिची पिवळी साडी, हळद-कुंकू आणि लिंब-मिरच्या मात्र तिथेच होते.
दुसरी घटना – वृद्ध महिलेला दिसली सावली!
एका वृद्ध महिलेच्या घरात दीड वाजता एका अनोळखी सावलीचे अस्तित्व जाणवले. ती काही बोलणार, तोच ती सावली नाहीशी झाली.
तिसरी घटना – दररोजच्या गूढ हालचाली!
गेल्या महिनाभरात अनेक घरांच्या बाथरूममध्ये लिंबू, दिवा, तांदूळ आणि काळा धागा ठेवले जात असल्याचे आढळून आले. काही लोकांनी रात्री दोन वाजेपर्यंत जागरण केले, पण नंतर अचानक वीज गुल झाली, आणि सकाळी तिथे गूढ वस्तू सापडल्या!
पोलीस पाटलांचे विधान – जाळून टाकले लिंबू!
गावातील पोलीस पाटलांनी सांगितले की, त्यांच्या गेटजवळ लिंबू आणि काही अघोरी वस्तू आढळल्या. त्यांनी भीती न बाळगता त्या वस्तू जाळून टाकल्या.
गावात गूढ प्रकार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
गेल्या काही दिवसांत गावात रहस्यमय आणि भितीदायक घटना घडत आहेत. घरासमोर लिंबू, कुंकू, मिरच्या, बाहुल्या ठेवण्याचे प्रकार, तसेच रात्री अज्ञात सावल्यांचे दर्शन गावकऱ्यांनी घेतले आहे. काहींना बाथरूमच्या दरवाज्यावर अचानक आवाजही ऐकू आला. या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सरपंच दादा लवकर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू आहे. गावकरी रात्रीच्या वेळी गट करून गस्त घालत आहेत. पोलिसांनी या गूढ घटनांचा तपास करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
‘हॅलो बुलडाणा’च्या टीमने घेतली ऑन-द-स्पॉट पाहणी!
या घटनेने गावभर भितीचं सावट पसरलं आहे. ‘हॅलो बुलडाणा’ टीम घटनास्थळी पोहोचली असता, ग्रामस्थांनी आपले अनुभव कथन केले. यामागे कोणता अंधश्रद्धेचा प्रकार आहे की कोणीतरी गावात दहशत माजवत आहे, याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.गावात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी त्वरित तपास सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ही अघोरी प्रथा आहे की गूढ वास्तव? लवकरच सत्य समोर येईल!