बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलडाण्यातील १७ वर्षे १० महिने वय असलेल्या बीएस्सी फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून छत्रपती संभाजीनगर येथून अपहरण करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला अकोला पोलिसांनी नाट्यमय कारवाईत पकडले. डाबकी रोड पोलिसांनी अकोला शहरातील एसबीआय बँकेसमोर नाकेबंदी करत थरारक सिनेस्टाइल पाठलागात गुन्हेगाराला जेरबंद केले.
कसे घडले अपहरण?
अपहृत मुलीचे वडील खासगी नोकरी करतात. ते २१ फेब्रुवारीला पत्नी व मुलीसह छत्रपती संभाजीनगर येथील गोगलानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले होते. मुकुंदवाडी बसथांब्यावर थांबले असताना मुलगी बाथरूमला जात असल्याचे सांगून निघाली. काही क्षणातच ती MH28-BQ-9337 क्रमांकाच्या टाटा नेक्सन कारमध्ये ओळखीचा मुलगा अमित बेंडवाल (२२, रा. शहर पोलीस ठाण्यामागे, बुलडाणा) याच्यासोबत जाताना वडिलांना दिसली. त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण अमित कार सुसाट घेऊन पळून गेला.
पोलिसांची झडप, गुन्हेगाराचा अयशस्वी प्रयत्न!
मुलगी बेपत्ता असल्याने वडिलांनी २३ फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तत्काळ शोध मोहीम सुरू झाली. बुलडाणा, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगर पोलिसांना सतर्क करण्यात आले. अखेर २६ फेब्रुवारीला डायल ११२ वर माहिती मिळाली की, आरोपी अमित मुलीला घेऊन अकोला शहरात जात आहे.
डाबकी रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय पहुरकर यांच्या पथकाने कारचा पाठलाग सुरू केला. महाशिवरात्री निमित्त गर्दीचा फायदा घेत आरोपी वेगाने निघून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी चतुराईने दुसरी टीम एसबीआय बँकेसमोर नाकेबंदीसाठी उभी केली.
गुन्हेगाराला पकडण्यासाठी सिनेस्टाइल पाठलाग!
नाकेबंदी पाहूनही अमितने वेग कमी केला नाही. त्याने एका मोटरसायकलला धडक दिली. पोलिसांनी परिस्थिती हाताळत त्याच्या कारसमोर वाहन आडवे लावले. अमितने पोलिसांच्या गाडीवर धडक दिली, मात्र त्याची कार बंद पडली. पोलिसांनी तत्काळ त्याला बाहेर काढून ताब्यात घेतले आणि मुलीची सुखरूप सुटका केली.
पोलिसांचे शौर्य, गुन्हेगार जेरबंद!
मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून अमित बेंडवालला अटक करून पुढील कारवाईसाठी मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या धडाकेबाज कारवाईबद्दल अकोला पोलिसांचे कौतुक होत आहे.”पोलिसांच्या वेगवान आणि शिस्तबद्ध कृतीमुळे एक तरुणी गुन्हेगाराच्या तावडीतून सुटली. ही कारवाई पोलिसांच्या धाडसाचे उत्तम उदाहरण आहे.”














