बुलढाणा (हॅलो बुलडाणा) काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी श्री संप्रदायाचे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांचे शिष्य आणि अनुयायी आक्रमक झाले आहेत. श्री संप्रदायाच्या वतीने आज राज्यभरात विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात आंदोलन पुकारले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुलढाण्यातही तीव्र निदर्शने करण्यात आली.
विजय वडेट्टीवार यांनी माफी मागावी अशी मागणी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिष्य आणि अनुयायांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संघ आणि संघ प्रणित साधू संत यांनी हिंदुत्व वाचविण्यासाठी जनजागरण केले. साधू संत पाठीशी असल्यामुळे महायुतीचा विजय झाला. नरेंद्राचार्य महाराज यांचेही सहकार्य लाभले असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले. या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर टीका करताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराजांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केले. या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात आता तीव्र पडसाद उमटत असून नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी आणि भक्तांनी रस्त्यावर उतरत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.. बुलढाणा जिल्ह्यात देखील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी आणि भक्तांनी कडाडून निषेध नोंदवत त्यांनी माफी मागावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारीही यावेळी देण्यात आला आहे.