लोणार (हॅलो बुलडाणा) बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर जगप्रसिद्ध आहे. त्याचे महत्त्व आणि व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी यावर्षी पासून लोणार पर्यटन महोत्सव सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मंत्रालयातील त्यांच्या दालना त्यांनी लोणार सरोवर बाबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत माजी आमदार संजय रायमुलकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन विभागाचे संचालक डॉ.बी. एन. पाटील, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील दूरदृष्यप्रणाली द्वारे उपस्थित होते.
जगात उल्कापातामुळे झालेले तीन सरोवर आहेत. त्यापैकी एक बुलढाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये आहे. त्याचे महत्त्व सर्वांना कळावे यासाठी राज्याच्या पर्यटन विभागातर्फे यावर्षी पासून पर्यटन महोत्सव घेणार असल्याचे मंत्री श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले. सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन त्याची तारीख व वेळ घोषित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.