बुलढाणा(हॅलो बुलढाणा) “आला रे राजा” या दिलीप जगताप लिखित व विजय सोनोने दिग्दर्शित नाटकाचा विनामूल्य प्रयोग कारंजा चौकस्थित बुलढाणा अर्बनच्या गोवर्धन सभागृहात ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
येथील अक्षरदेह नाट्यकला संस्थेच्यावतीने बुलढाणेकर नाट्य रसिकांसाठी या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. शासन, प्रशासन व समाज व्यवस्थेवर खोलवर भाष्य करणाऱ्या या नाटकाची निर्मिती माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशनने डॉ. गणेश गायकवाड, डॉ. दुर्गासिंग जाधव व डॉ. निखिल नलावडे यांच्या सहकार्याने केली आहे. नाटकातील प्रमुख भूमिका प्रसिद्ध सिने अभिनेता गणेश देशमुख यांनी केली असून प्रसाद दामले व विनय शुक्ल हे सहकलावंत आहेत. नाटकाची नेपथ्य संकल्पना अमरावतीचे वैभव देशमुख यांची आहे. नेपथ्य रचना पराग काचकुरे व धनंजय बोरकर यांनी केली असून संगीत विजय सोनोने यांचे आहे. लक्ष्मीकांत गोंदकर यांची प्रकाशयोजना असून प्रवीण इंगळे यांनी रंगभूषा केली आहे. वेशभूषा स्वप्नील दांदडे, पंजाबराव आखाडे, कल्याणी काळे यांनी केली आहे. रंगमंच व्यवस्थापन शशिकांत इंगळे, संतोष पाटील, गणेश राणे, विलास मानवतकर, प्रतिक शेजोळ, शुभम सोरमारे, अमोल चांगाडे यांनी केले आहे.बुलढाणा अर्बन, शारदा ज्ञानपीठ व बुलढाणेकर नाट्य कलावंत यांच्या सहकार्याने आयोजित या विनामूल्य प्रयोगाचा नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा , असे आवाहन अक्षरदेह नाट्यकला संस्थेतर्फे करण्यात आले आहे.