बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘ज्या कोनशिलेवर माझ्या आजोबांच्या ठिकाणी असणाऱ्यां आदरणीय कै.त्र्यंबक भिकाजी पाटील (अंत्री-खेडेकर) , कै. पुंडलिकराव गावंडे (बोथा-काजी), कै.महादेवराव आळशी (माटरगाव) या इतर काही माझ्या वाड़वडिलांची नावे अगदी ठळक पणाने नमूद होती. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत ए.आर. अंतुले यांचे देखील नाव होते. या कोनशीला भ्रष्टाचारी जिल्हा परिषदेने झाकुन ठेवल्याचे दुर्दैव असून,त्यांनीही चूक तात्काळ दुरुस्त करावी’, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष (राजीव गांधी पंचायती राज संघटन ) हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक अकाउंट वरून केली आहे.
त्यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंट वरून पोस्ट केली की, भूतकाळाच्या खांद्यावरच वर्तमान बसलेला असतो आणि वर्तमानाचे भान भविष्य घडवीत असतो ! वर्तमानातून भूतकाळ वजा केल्यास केवळ शून्य उरतो व जिथे गतकाळातील पिढी आपले ओजस्वी आणि तेजस्वी अद्वितीय योगदान देऊन जाते ; केवळ तिथेच अमृतकाळ निर्माण होऊ शकतो.बुलढाणा जिल्हा परिषद/जनपद/जिल्हाबोर्ड या संस्थेचा स्वातंत्र्य पूर्व व उत्तर काळात मोठा ऐतिहासिक ठेवा आहे. अनेक कर्तबगार नेत्यांचे मोठे योगदान जिल्ह्यास लाभलेले होते. ज्यांच्या पासून प्रेरणा घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता सार्वजनिक जीवनात धडपडतोय, असं म्हटल्यास वावग ठरणार नाही. गत काही वर्षांमध्ये बुलढाणा जिल्हा परिषद केवळ भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. हे दुर्दैव नाहीतर दुर्भाग्य ! एवढ्यावरच हे प्रकरण थांबलेलं नाही. ज्या संस्थेबद्दल मला नितांत प्रेम-आदर- आपुलकी आहे,एवढेच नव्हे तर ज्या संस्थेमुळेच माझ्यातील कार्यकर्ता व नेतृत्व क्षमतेची जडणघडण झाली याची मला सातत्याने जाणीव असते. या संस्थेत मात्र गत काही वर्षांपासून गलथान, विचित्र व असभ्य कारभार सुरू असल्यामुळे ऐरवी मी तिकडे फिरकतही नाही. मात्र आज एका कामानिमित्त गेलो असता धक्कादायक व अस्विकार्य बदल दिसला . जो चक्क विकृती स्वरूपाचा आहे. मी त्याचा धिक्कार करतो , तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने झालेली चूक तत्काळ दुरुस्त करावी, ही मागणी करतो. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दोन्ही बाजूने संगमरवरी दगडांवर दोन कोनशीला लावलेल्या होत्या. ज्या केवळ इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्याच्या उद्घाटन भूमिपूजनाच्याच नव्हे तर गत सुवर्ण काळाच्या साक्षी देखील होत्या. ज्या कोनशिलेवर माझ्या आजोबांच्या ठिकाणी असणाऱ्यां आदरणीय कै.त्र्यंबक भिकाजी पाटील (अंत्री-खेडेकर) , कै. पुंडलिकराव गावंडे(बोथा-काजी), कै. महादेवराव आळशी (माटरगाव) या इतर काही माझ्या वाड़वडिलांची नावे अगदी ठळक पणाने नमूद होती. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत ए.आर. अंतुले यांचे देखील नाव होते. या कोनशीला झाकुन त्याच ठिकाणी जिल्हा परिषद “आजादी का अमृत महोत्सव” साजरा करीत आहेत. सदर बोर्ड इतरत्र लावायला कुठली ही हरकत नाही.मात्र आपल्या जिल्ह्याचे भूषण असणाऱ्या सोन्यासारख्या लोकांचे नावे झाकने , ही आमच्या जाज्वल्य परंपरेची अवहेलना आहे, ही सहन करणे शक्य नाही. तेव्हा प्रशासनाने त्वरीत चूक दुरुस्त करावी, ही सूचना आहे.शिवाय ते म्हणाले की, हे केंव्हा झाले ? कोणी केले ? याची झाडाझडती घेतली.तेंव्हा सदर प्रकार दोन वर्षांपूर्वी चा असल्याचे समजले. भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम तोडणाऱ्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सगळ्यांनी अंगुलीनिर्देश केला. ही अत्यंत गंभीर बाब असूनही इतक्या उशिराने लक्षात येत असल्याबद्दल मी इतिहासाची/वाडवडिलांची क्षमा मागतो व सदर चूक दुरुस्त न केल्यास आमची पिढी नालायक आहे असा अर्थ आपसुक त्यातून निघेल हेही मी नम्रपणे मान्य करतो.














