बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पौराणिक कथेतील देवी देवतांचे नयनरम्य जिवंत देखावे.. महाराजांच्या अमृतवाणीतील भाविकांनी वेचलेले भक्तिचे अमृतकण..देवतांचा जयघोष आणि वाद्यांच्या मंजूळ गजरात काढण्यात आलेली दिंडी..दिंडीत फुगड्यांचे फेर..मंत्रमुग्ध करणारी पावली असे भावधुंद चित्र श्रीमद् भागवत कथा सोहळ्यात दिसून आले.या सोहळ्याची 6 फेब्रुवारीला येथील संत गाडगे नगरात मिरवणूक व महाप्रसादाने सांगता करण्यात आली.
‘मातृ पितृ पूजन प्रित्यर्थ’ हूरपडे परिवार अंजनगाव सुर्जी द्वारा सुंदरखेड बुलढाणा येथील गाडगे नगरात श्री गणपती,मारुती महाराज मंदिरात 30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण व संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमद् भागवत सप्ताहात भागवत कथा महात्म,कपिल मुनी अवतार,दक्ष राजा,ध्रुवचरित्र,श्रीराम जन्म व श्रीकृष्ण जन्म, श्रीकृष्ण चरित्र व गोवर्धन पूजा, रुक्मिणी स्वयंवर, परिस्थिती भागवत मुक्ती, हळदी कुंकू,दीप महोत्सव व गुरुपूजन, व्याख्यान अशा धार्मिक कार्यक्रमांनी भक्ती रंग उधळला. विशेष म्हणजे सादर करण्यात आलेले पौराणिक जिवंत देखावे डोळ्यात स्थिरावणारे होते. भजन- अभंग कीर्तनाने परिसर दणाणून गेला होता. 6 फेब्रुवारीला दिंडी मिरवणुकीने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.दिंडी सोहळ्याने डोळ्याची पारणे फेडले. या आध्यात्मिक कार्यक्रमाला श्री गणपती हनुमान मंदिर समिती गाडगे नगर,सुंदर खेड,श्रीदुर्गा महिला भजनी मंडळ गाडगे नगर सुंदर खेड,भागवत धर्म प्रसारक वारकरी बहुउद्देशीय संस्था तानाजी नगर बुलढाणा यांचे विशेष सहकार्य लाभले.
▪️यांचे होते अमृत बोल..
हभप श्री वासुदेव महाराज येसोने, हभप श्री गंगाराम जी गव्हाळे (श्री ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ) हभप इंदुमतीताई गव्हाळे,हभप अनिताताई पवार हभप सुनंदाताई चौधरी, हभप सुधाकरराव हुरपडे व हभप रजनीताई हुरपडे (प्रमुख यजमान) हभप स्वप्निल हुरपडे व हभप शैलाताई हुरपडे (आयोजक), हभप कुमारी आकांक्षा ताई हुरपडे व हभप अमेय हुरपडे (व्यवस्थापक)