बुलढाणा (हॅलो बुलडाणा) प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात मलकापूर येथील वृद्ध महिला बेपत्ता झाली असून तिच्यासोबत गेलेल्या महिलेचाही मोबाईल बंद असल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन प्रयागराजमधील यंत्रणेशी संपर्क साधत असून शोधकार्याला वेग देण्यात आला आहे.
चेंगराचेंगरीत बेपत्ता? कुटुंबीयांची चिंता वाढली!
मलकापूर येथील उषाबाई लक्ष्मण बोरले या ७० वर्षीय महिला कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेल्या होत्या. त्यांच्यासोबत यमुनाबाई भालेराव या महिलाही होत्या. मौनी अमावास्येच्या दिवशी मोठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली होती. त्यानंतर उषाबाई बेपत्ता झाल्या असून, त्यांच्यासोबतच्या महिलेचाही फोन लागत नसल्याने कुटुंबीय अधिकच हवालदिल झाले आहेत.
प्रशासनाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा!
बेपत्ता महिलेचा मुलगा संतोष बोरले आणि भाऊ आकाश बोरले यांनी मलकापूर तहसीलदार राहुल तायडे यांच्याकडे धाव घेतली. माहिती मिळताच जिल्हाधिकारी किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी प्रयागराज प्रशासनाशी संपर्क साधला आहे.जिल्ह्यातील भाविकांसाठी प्रशासनाने विशेष हेल्पलाईन नंबर जारी केले असून, कुंभमेळ्यात अडचणीत आलेल्या नागरिकांनी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.