बुलडाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील बाजार लाईन परिसरात आज सायंकाळी 5 वाजता मोठा अनर्थ टळला. न्यायालयाच्या मागील भागातील जिल्हा परिषद ग्राउंडजवळ कचऱ्याला लागलेल्या आगीने काही क्षणांतच मोठा पेट घेतला. या आगीमुळे परिसरातील खान कॉम्प्लेक्ससमोरील दुकाने आणि रस्त्यावरील छोटे-मोठे व्यापारी मोठ्या संकटाच्या सावटाखाली आले होते.
आग वेगाने पसरत असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच परिसरातील सतर्क नागरिकांनी वेळेवर मदत केल्याने मोठी हानी टळली.
जर ही आग वेळीच आटोक्यात आणली नसती, तर परिसरातील दुकाने आणि इमारतींना मोठे नुकसान झाले असते. स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले असून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कचरा व्यवस्थापन अधिक मजबूत करण्याची मागणी केली आहे.














