बुलढाणा (हॅलो बुलडाणा)सध्या तरुणाईला गांजा ओढण्याच्या व्यसनाने गुरफटून टाकले आहे. गांजा ओढण्याचे व्यसन पूर्ण करण्यासाठी ते वाममार्गाला लागलेत. परंतु सुसंस्कृत बुलढाणा शहरात व जिल्ह्यात गांजा दाखल होतोच कसा? आणि व्यसनींना सहज उपलब्ध होतो कसा? हा कळीचा मुद्दा बनला आहे. तर अवैधपणे दारू विक्रीला उधाण आल्याचे दिसते.
बुलढाणा शहर व जिल्ह्यात अनेक तरूण व उच्चभ्रू लोकांची मुलेदेखील गांजा ओढण्याच्या अधीन गेली आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी अनेकदा गांजा पकडला आहे. परंतु गांजा कारवाई नाममात्र दिसत असून या व्यसनींना गांजा सहज उपलब्ध होत असल्याचे अस्वस्थ चित्र आहे. यांचा सार्वजनिक ठिकाणी ठिय्या दिसून येतो.गांजा ओढणारी ही टोळी वाम मार्गाला लागली असून चोरी केल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या पैशांवर त्यांना जडलेले व्यसन करतात. हे व्यसन पूर्ण करण्यासाठी घरातून पैसे न मिळाल्यास ही मुले मोबाईल, मोटारसायकल यांसह “चैन स्नॅचिंग’ अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करण्यासाठी ते मागेपुढे पाहत नाहीत. दरम्यान पोलिसांनी जेथे गांजा विकत भेटतो त्याची पाळेमुळे खणून काढावे अन्यथा युवापिढीला व्यसनातून बाहेर काढणे जिकिरीचे ठरणार आहे. तसेच अवैध दारू विक्रीला उधाण आले असून, यामध्ये पोलिसांचे ‘हात तर ओले’ होत नाही ना ?असा प्रश्न विचारला जात आहे.
@ मुलांचे प्रमाण धक्कादायक !
सिगारेटच्या सवयीमुळे अनेकांना गांजा ओढण्याची सवय जडली आहे. गांजा ओढण्याचे सर्वाधिक प्रमाण अल्पवयीन व अविवाहित युवकांचे आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा गांजा ओढल्यानंतर त्याचा दिवसभर नशा राहतो, तसेच हे व्यसन कमी पैशांत देखील होत असल्याने आताची युवापिढी व्यसनाच्या अधीन गेली आहे.