शेगाव (हॅलो बुलडाणा) बोंडगाव,कालवड व हिंगणा ही शेगाव तालुक्यातील गावे सध्या अज्ञात आजाराने केस गळतीमुळे ‘टकल्यांचे गाव’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.केस गळतीमुळे गावकरी हैराण झाले असून,या गावात आरोग्य पथक देखील दाखल झाले आहे.
बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क 3 दिवसांतच संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. याप्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे. अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत तिन्ही गावांतील शेकडो नागरिकांची केस गळती झाली आहे. त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे.
▪️आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी!
आतापर्यंत आरोग्य विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या तीनही गावांमध्ये उद्भवलेल्या समस्येबाबत उपचार शिबिर घेण्याची मागणी शेगाव तालुका (शिवसेनाप्रमुख) रामेश्वर थारकर यांनी केली आहे.
तीन दिवसातच आपोआप टक्कल पडत आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गीते यांना निवेदन देत केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनाही देण्यात आले आहे.
▪️सर्वेक्षणात आढळले 30 बाधित!
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंडगावात सर्वेक्षण केले. त्यामध्ये केस गळतीच्या आजाराने 30 जण बाधित असल्याची माहिती पुढे आली. त्यांच्याबाबत पुढील उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले. त्यांच्याकडून रूग्णांची लक्षण आणि उपचार सुरू करण्यात आले.
▪️या कारणांमुळे आजाराची शक्यता!
गावातील पाण्याचा स्त्रोत दुषित आहे का, तसेच पाण्याचा जडपणा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्याचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच काही रूग्णांची त्वचारोग तज्ञांकडे उपचार घेतले असता शाँम्पूमुळे असा प्रकार होऊ शकतो, अशी माहिती त्यांना देण्यात आली.
▪️तालुका आरोग्य अधिकारीडाँ. दीपाली बाहेकर म्हणतात..
तीनही गावातील या प्रकाराची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ््यांचे पथक गावात पोहचले. त्यांनी सर्वेक्षणासोबतच आरोग्यविषयक सल्ला दिला आहे. तसेच लक्षणानुसार आैषधोपचारही सुरू केला. या समस्येवर त्वचारोग तज्ञांचा सल्ला घेतला जात आहे.