डोणगाव (हॅलो बुलडाणा /अनिल राठोड) ज्या प्रकरणाने रौद्ररूप धारण केले होते अशा कोलकाता येथील हॉस्पिटल मध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर आणि बदलापूर आणि येथील शाळेतील अत्याचाराला सहा महिने उलटूनही बहुतांश शाळांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शासनाने नेमून दिलेल्या कुठल्याच सुरक्षा तत्त्वांचे पालन केलेले दिसून येत नाही.त्यामुळे डोणगावसह बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाळा आणि सर्व शाळां प्रशासनाची असंवेदनशीलता दिसत आहे.
2024 च्या ऑगस्ट महिन्यामध्ये बदलापूर येथील एका शाळेमध्ये कार्यरत असलेल्या नराधमाने संपूर्ण राज्यातील शाळा व्यवस्थपणाला काळीमा फासली होती.आज तो या जगात नसेल तरीही त्याने केलेल्या कृत्याने आजही महाराष्ट्राच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
त्या प्रकरणाच्या गांभिर्याने महाराष्ट्र शासनाने शाळांमध्ये सीसीटीव्ही आणि मुलीच्या सुरक्षेसाठी महिला कर्मचारीवर्ग अधिक कार्यान्वित करण्यास सांगितले होते पण सहा महिने होऊनही बहुतांश शाळा ह्या वीणा सीसीटीव्ही आणि सुरक्षेची काळजी घेताना दिसत नाहीत.डोणगाव येथे अनेक शाळा आहे त्यापैकी दोन महाविद्यालये आहेत. ज्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे.येथे चीडीमार मोकाट दिसून येतात. त्यांच्यावर कुठलाच लगाम राहिला नाही. अनुचित प्रकार घडण्याची वेळ सांगून येत नाही त्यामुळे शाळा प्रशासनाने कठोर पावले उचलून त्यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच पोलिस प्रशासनाने सुद्धा काही वेळ शाळांमध्ये काही विद्यार्थिनी प्रत्यक्ष तक्रार करू शकत नाही या अनुषंगाने विद्यार्थिनींसाठी तक्रारपेट्या लावल्या होत्या पण त्या कधी उघडल्या जातात हे सुद्धा कधी निदर्शनास आले नाही.फक्त डोणगाव मध्ये एकूण जवळपास १० ते ११ वी पर्यंत शाळा आहेत पण एक दोन शाळा सोडल्या तर कुठल्याच शाळांनी सीसीटीव्ही किंवा तस्संम प्रकारची व्यवस्था सुरक्षा हेतूने केलेली नाही.आणि तालुक्यात जवळपास ३०० च्या वर सरकारी, निमसरकारी आणि खाजगी शाळा आहेत. आणि विकृत प्रवृत्ती समाजात फोफावत आहे. दिवसागणिक कुठे ना कुठे मुलींची छेड काढणे पाठलाग करणे अश्लील हावभाव करण्याच्या घटना कानावर येत आहेत. पण या घटनांना कुणीच गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवस्था ही पुन्हा एखादी अनुचित घटना वा प्रकार घडण्याची च वाट बघत आहे असे दिसून येत आहे.