बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मुंबई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत बुलढाण्याची कन्या पौर्णिमा प्रकाश सोनुने हिने अभूतपूर्व यश मिळवत चौथा क्रमांक पटकावला आहे. ऑलम्पिया 2024 स्पर्धेत पौर्णिमाने आपले कौशल्य आणि मेहनतीच्या बळावर बुलडाण्याचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे.
अत्यंत खडतर मेहनत, आत्मविश्वास आणि जिद्द याच्या जोरावर पौर्णिमाने हा मानाचा तुरा स्वतःच्या शिरावर रोवला आहे. विविध देशांतील प्रतिभावंत खेळाडूंमध्ये आपल्या देहबांध्याच्या पराक्रमाने तिने आपली चमक दाखवली. तिच्या या विजयामुळे विदर्भातील क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून, तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पौर्णिमा प्रकाश सोनुने ही नेहमीच अपार मेहनतीसाठी ओळखली जाते.तिच्या विजयानंतर बुलडाणा शहरात जल्लोषाचा माहोल आहे. यशाच्या या शिखरावर पोहोचण्यासाठी तिने घेतलेले कष्ट आणि तिच्या झुंजार प्रवासाने तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
स्पर्धेतील हा ऐतिहासिक विजय विदर्भासाठी अभिमानास्पद असून, पौर्णिमाच्या यशाचे सूर प्रत्येकाच्या ओठांवर आहेत.
टीम ‘हॅलो बुलडाणा’ व समस्त बुलढाणेकरांकडून कडून पौर्णिमा तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!