सिंदखेड राजा (हॅलो बुलडाणा) महायुती सरकारने जिल्हा सहकारी बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे यांना 300 कोटी रुपये मिळवून दिले परंतु त्यांनी दुसऱ्या पक्षात पळ काढला मात्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.नाझीर काजी यांच्या नेतृत्वाखालील संघटन कौशल्याने व जि प सदस्य राहिलेले मनोज कायंदे यांच्या सकारात्मक वृत्तीने कायंदे विधानसभा निवडणुकीत जिंकून आले.हे श्रेय काझी यांना जाते,असे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार म्हणालेत.
अजित दादा पवार यांनी बुलढाणा राष्ट्रवादी (अजितदादा गट) जिल्हाध्यक्ष ॲड.नाझीर काझी यांचे अभिनंदन करीत,नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांच्या विजयाचा लेखाजोखा मीडियासमोर मांडला.अजित दादा म्हणाले की,महायुती सरकारने बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेला अडचणीतून सावरण्यासाठी 300 कोटी रुपये देण्याची गॅरंटी दिली होती.हा शब्द देखील पूर्ण करण्यात आला. कारण शेतकऱ्यांची आर्थिक नाळ जोडलेली ही बँक आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि येथे शेतकऱ्यांचा चांगला प्रतिनिधी म्हणून आम्ही हा प्रयत्न केला.परंतु हा प्रतिनिधी पक्ष सोडून गेला.दरम्यान विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अनेक उमेदवारांनी आमच्या पक्षाचे तिकीट मागण्यासाठी साकडे घातले. यामध्ये प्रामुख्याने तोताराम कायंदे यांचे चिरंजीव इच्छुक होते. शिवसेनेकडून निवडणूक लढविणारे डॉ. शशिकांत खेडकर देखील इच्छुक होते शिवाय डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुतणी गायत्री शिंगणे ह्या देखील इच्छुक होत्या.परंतुॲड.नाझीर काझी यांनी मला व प्रफुल्ल पटेल यांना कुणाचे ऐकू नका म्हणून सांगून कायंदे यांना तिकीट देण्याचा आग्रह केला. कायंदे जर निवडून नाही आले तर तोंड दाखवणार नाही ! असेही काझी यांनी शब्द वापरले!या शब्दांवर विश्वास ठेवत आणि संघटन कौशल्य बघून नामदार छगन भुजबळांची सभा घेण्यात आली.ही सभा प्रचंड गाजली आणि विधानसभा निवडणुकीत मनोज कायंदे जायंट किलर ठरले.हे श्रेय काझी यांचेच आहे असेही पवार म्हणाले.