बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ग्रामीण भागातील पाचशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या रस्त्याने न जोडलेल्या वस्त्यांना बारमाही रस्त्यांनी जोडणे या उद्देशाने पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यान्वित आहे. परंतु बुलढाणा येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या जिल्हा प्रयोगशाळेतील भ्रष्ट कारभाराने रस्त्यांच्या कामांचा दर्जा ढसाळला असून,कामासाठी वापरण्यात येणाऱ्या बांधकाम साहित्याची तपासणी न करता कंत्राटदाराला निकृष्ट काम करण्यासाठी मोकळे रान करून देत असल्याची तक्रार पुढे येत असून,रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग मार्फत डांबरी रस्ते काम,पूल बांधकाम, सभामंडप आदी कामे केली जातात. या कामात नियमानुसार सिमेंट, क्यूब, डांबर- रेती,आदी साहित्याची तपासणी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या प्रयोगशाळेतून करण्याचा नियम आहे. तपासणी झाल्यानंतरच कंत्राटदाराला टेस्ट रिपोर्ट देण्यात येतो.आणि त्यानंतर कंत्राटदाराची देयक अदा करण्यात येते.परंतु येथील पंतप्रधान मंत्री ग्रामसडक योजनेच्या प्रयोगशाळेत अर्थपूर्ण कारभार सुरू असल्याची ओरड आहे. कंत्राटदाराकडून कुठलेही साहित्य न तपासता मोठ्या प्रमाणात पैसा उकळल्या जात असल्याने कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.त्यामुळे रस्त्यांसह इतरही बांधकामांचा दर्जा सुमार झाल्याचे चित्र आहे.