सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा) मतदारसंघात महायुतीतील अंतर्गत वाद अखेर शमला आहे. सुरुवातीला महायुतीकडून दोन उमेदवार होते – शशिकांत खेडेकर (शिवसेना शिंदे गट) आणि मनोज कायंदे (राष्ट्रवादी अजित पवार गट). मात्र, महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून शशिकांत खेडेकर यांना मान्यता देण्यात आली असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाने मनोज कायंदे यांना बाजूला करत खेडेकर यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
महायुतीत सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे सिंदखेडराजा मतदारसंघात गोंधळाचे वातावरण होते. दोन्ही गटांच्या उमेदवारांमुळे महायुतीच्या संभाव्य मतविभाजनाची शक्यता वर्तवली जात होती. यामुळे महायुतीचे नुकसान होऊ नये म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाने भावनिक भूमिका घेत शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा जाहीर केल्याचा पत्र सोशल वर व्हायरल होत आहे.
मनोज कायंदे यांना डच्चू देत अजित पवार गटाने प्रसारमाध्यमांतून प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यामुळे मतदारसंघात निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, मनोज कायंदे यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीने घेतलेल्या या निर्णयामुळे विरोधकांसमोर एकत्रित आव्हान उभे राहिले आहे. तर, शशिकांत खेडेकर यांनी केलेल्या ‘करेक्ट कार्यकमामुळे महायुतीला निवडणुकीत कितपत यश मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.