बुलढाणा ( हॅलो बुलढाणा) वटवृक्षाची पूजा करुन सावित्रीने आपला पती सत्यवान यांचा प्राणाची रक्षा केली होती. यासाठीच नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करणे महत्वाचे मानले जाते.अशी मान्यता आहे की, या व्रताच्या प्रभावामुळे महिलांना पतीच्या दीर्घायुष्यासह सुखी वैवाहिक जीवन लाभते. तर जाणून घ्या यंदाच्या वर्षी वटपौर्णिमेची पूजा कशी करावी. त्याचसोबत त्यासाठी लागणारे पूजा, साहित्य, विधी, शुभ मूहर्ताबद्दल अधिक.
ज्येष्ठ पौर्णिमेला विवाहित महिला हे व्रत करतात. हे तीन दिवसाचे व्रत असते. या व्रताची सुरुवात पौर्णिमेच्या आधी दोन दिवस करण्यात येते. तर शक्य नसल्यास केवळ पोर्णिमेला व्रत करुन पूजा करावी. दिवसभर उपवास करून यादिवशी रात्री हा उपवास सोडावा. हे तिन्ही दिवस अगदी षोडशोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी असे सांगितले जाते. पूजेसाठी
४ हिरव्या बांगड्या, हळद-कुंकू, एक गळसरी, पुजेचं वस्त्र, सुपारी, विड्याची पाने, पैसे,अत्तर, पंचामृत, कापूर, गुळ-खोबऱ्याचा नैवेद्य, ५ फळं, सती मातेचा फोटो किंवा सुपारी, दोरा असे साहित्य लागते. पूजा विधीही सोपी आहे.जर वडाच्या पारावर जाणं शक्य नसेल तर घरीच वटपौर्णिमेचा कागद लावून त्याची पूजा करावी. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. त्यावर हळद-कुंकू , अक्षता वाहून पूजा करावी. त्यानंतर वडाच्या मुळाची व सती मातेची याच पद्धतीने पूजा करावी. त्यानंतर सती मातेजवळ विड्याची पानं ठेवून त्यावर पैसा-सुपारी ठेवावी. सोबतच हिरव्या बांगड्या, गळसरी, पुजेचं वस्त्र, पाच फळं ठेवावीत. त्यानंतर गुळ-खोबरं व पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. सारं काही व्यवस्थित झाल्यावर कापूर आरती करावी. पूजा झाल्यावर स्त्रियांनी वडाला दोरा गुंडाळात सात फेऱ्या माराव्यात.दरम्यान, या दिवशी स्त्रियांनी पूर्ण दिवस उपवास करावा व दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा.