बुलढाणा (हॅलो बुलढाणा)दहावा आंतरराष्ट्रीय योगदिनाचा मुख्य कार्यक्रम जम्मू कश्मीर येथे होणार असून, या कार्यक्रमांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय आयुषमंत्री ना. प्रतापराव जाधव हे योग प्रात्यक्षिक साधनेमध्ये सहभागी होणार आहेत. योगदिनात बुलडाणा लोकसभेचे सदस्य पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करणार असल्याची बाब बुलढाणेकरांसाठी भूषणावह आहे.
पाचहजार वर्षापूर्वीपासून चालत आलेली योग साधना ही भारतीयांची जीवन जगण्याची पद्धत होती. योग साधनेमुळे मनुष्याचे आरोग्य निरोगी राहते. सुदृढ आयुष्यासाठी योगसाधनेचे महत्त्व संपूर्ण जगाला समजल्यामुळे सर्व देशांमध्ये योग साधनेला आज अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. या योगसाधनेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रयत्न केले. सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करावा, असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. या प्रस्तावाला 193 देशापैकी 175 देशांनी होकार दिला. डिसेंबर 2014 मध्ये हा ठराव पारित झाला. त्यामुळे एक 21 जून 2015 ला पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन संपूर्ण विश्वामध्ये साजरा करण्यात आला. यावर्षीचं योगदिनाचे घोषवाक्य ” योग स्वयम आणि समाजासाठी” हे आहे .. योगाचा उपयोग स्वतःच्या आरोग्यासाठी आणि समाजाच्या स्वास्थ्याकरिता महत्त्वाचा आहे. यावर्षीचा दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन भारताच्या वतीने जम्मू कश्मीर येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. यावेळी योगाचे महत्त्व आणि योग प्रात्यक्षिक सादर केल्या जाणार आहे. योग प्रात्यक्षिकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आयुष्यमंत्री ना. प्रतापराव जाधव हे सहभागी होणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात योगसाधनेला असलेलं महत्त्व आणि भारताची योगासंदर्भातील भूमिका यावेळी दोन्ही नामदार विशद करणार आहेत.
हा तर बुलडाणेकरांचा सन्मान…
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आयुष्य राज्यमंत्री म्हणून काम करण्याची प्रथमच संधी मिळाली. मंत्री पदाचा पदभार स्वीकारून केवळ दहाच दिवस झालेले असताना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रतिज्ञा करण्याची संधी मिळाली, ही बुलढाणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
जिल्हावासियांना भूमिपुत्राचे आवाहन
जगभर योगदिन साजरा होत असतानाच मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातही दरवर्षी जिल्हावासिय सहभागी होतात. यावेळी देखील जिल्ह्यातील नागरिकांनी ठिकठिकाणी आयोजित योगदिनात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याचा खासदार व भूमिपुत्र या नात्याने ना. प्रतापराव जाधव यांनी केले आहे