चिखली (हॅलो बुलडाणा) केवळ अडीच वर्षात कोलारा गावचा चेहरामोहरा बदलणाऱ्या आमदार म्हणून श्वेताताई महाले यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. कारण, त्यांनी या अल्पावधीत केलेल्या कामाची बरोबरी दहा वर्षे आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराकडून किंचितही होणार नाही. श्वेताताई महाले यांनी कोलारा येथे केलेल्या महत्त्वपूर्ण विकासकामांची परतफेड येथील जनता मतदानातून निश्चितच करेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. प्रतापसिंह राजपूत यांनी व्यक्त केला. दि. ८ नोव्हेंबर रोजी कोलारा सर्कलमधील जन आशीर्वाद दौऱ्याच्या सांगते प्रसंगी झालेल्या जाहीर सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
चिखली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या प्रचारानिमित्त काढण्यात येणाऱ्या जन आशीर्वाद दौऱ्याचे आयोजन ८ नोव्हेंबर रोजी कोलारा जिल्हा परिषद सर्कलमध्ये करण्यात आले होते. या अंतर्गत भालगाव, गांगलगाव, कवठळ, चंदनपूर, काटोडा, रान अंत्री, अंबाशी, खैरव, मुंगसरी, आमखेड, आणि कोलारा येथे श्वेताताई महाले यांनी भेटी देऊन स्थानिक मतदारांशी संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले. ठिकठिकाणी महिला व युवा वर्गाने आ. महाले यांचे जल्लोषात स्वागत केले. कोलारा येथे काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीमध्ये तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. गावातील महादेव मंदिर, बुद्ध विहार, अण्णाभाऊ साठे स्मारक आदी ठिकाणी भेटी देत ही रॅली ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात पोहोचली. तेथे रॅलीचे सभेमध्ये रुपांतर झाले. या सभेला भाजपाचे जेष्ठ नेते डॉ. दामोदर भवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रतापसिंह राजपूत व शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख यांनी संबोधित केले. यावेळी मंचावर भाजपाचे जेष्ठ नेते साहेबराव सोळंकी, तालुका अध्यक्ष गजानन पोपळे, कृष्णकुमार सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन मोरे, पंजाबराव धनवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्वेताताई महाले जनतेच्या समस्या जाणून सोडवणाऱ्या आमदार – डॉ. राजपूत
आ. श्वेताताई महाले या जनतेच्या समस्या सोडवणाऱ्या लोकप्रतिनिधी आहेत याचा अनुभव मागील अडीच वर्षात कोलारा येथील नागरिकांनी घेतल्याचे डॉ. प्रतापसिंह राजपूत म्हणाले. केवळ अडीच वर्षाच्या अतिशय कमी कालावधीत श्वेताताई महाले यांनी कोलारा गावाला जलजीवन मिशनद्वारे कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करून दिली. गावात संविधान भवन, ग्रामपंचायत भवन, जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण व हिंदूसूर्य महाराणा प्रताप पुतळ्याचे सौंदर्यीकरण श्री सिद्धेश्वर मंदिराला शंभर कोटी रुपयांचा निधी देऊन येथे आवश्यक त्या सुविधांची निर्मिती आदी ठोस कामे तर केलीतच याशिवाय ठीकठिकाणी सिमेंट रस्ते, अंतर्गत रस्ते या माध्यमातून ग्रामवासीयांच्या समस्या दूर करण्याचा देखील सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे डॉ. प्रतापसिंह राजपूत यांनी सांगितले.