बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील एक अत्यंत महत्वाचा असा मतदारसंघ म्हणजे चिखली विधानसभा मतदारसंघ होय. एकेकाळी पंढरीनाथ पाटील किंवा माजी उद्योग मंत्री भारत बोंद्रे यांच्यासारख्या दिग्गजांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. यंदाच्या निवडणुकीत येथे थेट महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लढत होताना दिसून येत आहे. परंतु या लढतीत विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांच्यापेक्षा राहूल बोंद्रे यांचे पारडे अधिक जड दिसून येत आहे. याला अनेक प्रकारची कारणे आहेत. त्या कारणांची मीमांसा केल्यास आपल्याला या ठिकाणच्या संभाव्य निकालाचा अंदाज घेता येऊ शकतो.
गेल्या विधानसभा निवडणुकीतही श्वेताताई महाले आणि राहूल बोंद्रे यांच्यात थेट लढत झाली होती. त्या वेळी राहूल बोंद्रे हे विजयी होतील, असाच राजकीय निरीक्षकांचा होरा होता. परंतु अचानक श्वेताताई जायंट किलर ठरल्या आणि त्यांनी राहूल बोंद्रे यांचा पराभव केला. गेल्या पाच वर्षांपासून श्वेताताई महाले या आमदार असल्या, तरी मतदारसंघात म्हणावी तशी विकासकामे झालेली आहेत, हे विधान मोठे धाडसाचेच ठरेल. विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती एकसंधपणे लढली होती, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती.
राहूल बोंद्रे यांच्याकडे मोठा राजकीय वारसा आहे. राहूल बोंद्रे यांनी अगदी नगरसेवक, नगराध्यक्ष के आमदारापर्यंतचा मोठा प्रवास केलेला आहे. राहूल बोंद्रे यांचे राजकारण नेहमीच सर्वसमावेशक राहिलेले आहे. त्यांचा विविध संस्थांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. एक हसतमुख चेहरा आणि सर्वांशी मिळून-मिसळून वागण्याची त्यांची हातोटी आहे. सर्व जातीधर्मातील नागरिकांना एक सूत्रात बांधून त्यांच्यात समन्वय साधण्याचे कसब राहूल बोंद्रे यांच्याकडे आहे. मतदारसंघात एक धर्मनिरपेक्ष व्यक्ती म्हणून त्यांची छवी प्रसिद्ध आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या वेळेसदेखील भाजपची लाट राज्यात होती. त्यामुळेच भाजपला त्या वेळी एकूण १०५ आमदारांचे बळ मिळाले होते. परंतु गेल्या आडीच वर्षांमध्ये भाजपच्या वतीने जो काही राजकीय गोंधळ राज्यात घालण्यात आला, त्यामुळे राज्यात भाजपच्या छवीला मोठा धक्का लागला आहे. तीच गत चिखली विधानसभा मतदारसंघातदेखील झालेली आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा कानोसा घेतला असता, कुठेतरी विद्यमान आमदारांच्या विरोधात सामान्य जनतेच्या मनात एक सुप्त प्रकारचा रोष दिसून येतोच. मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे विकासकामे झाली नसल्याचे मत सर्वसामान्य मतदारांचे आहे. त्याचा फटका नक्कीच श्वेताताई महाले यांना बसू शकतो. राज्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या (की घडवून आणलेल्या) राजकीय खिचडीमुळे आणि पक्षांच्या फोडाफोडीमुळे एकीकडे उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे शरद पवार यांच्याविषयी जनतेत एक सूप्त प्रकारची सहानुभूती निर्माण झालेली आहे. त्यामुळेच सध्या राज्यात महाविकास आघाडीचे पारडे जे जड दिसते, त्याचाही कुठेतरी फायदा हा राहूल बोंद्रेंना यांना मिळण्याची शक्यता दिसून येत आहे.
मागील निवडणुकीतील पराभवानंतरही गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात राहूल बोंद्रे यांनी मतदारसंघात दांडगा जनसंपर्क ठेवला. जनतेच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. मतदारसंघातील विशिष्ट समाजाची नावे वगळण्याच्या मुद्द्यावरून राहूल बोंद्रे यांनी चांगलेच रणकंदन केले आहे. त्यामुळे मतदारसंघात मोठा मॅसेज गेला आहे. त्याचाही काही परिणाम होतो का हे निकालानंतर दिसूनच येणार आहे.
एकंदर सर्व परिस्थितीचा सारासार विचार केला तर यंदा एकीकडे चिखली मतदारसंघातील निवडणूक तुल्यबळ होणार असली, तरी राहूल बोंद्रे यांचे पारडे जड दिसून येत आहे.