देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) कापसाला बारा हजार तर सोयाबीनला प्रति क्विंटल आठ हजार रुपये भाव मिळावा, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्थानिक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान सोयाबीनला प्रतिक्विंटल आठ हजार रुपये तसेच कापसाला बारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे. कोणतीही अट न लावता शेतकऱ्यांना खरीप व रब्बीचा पिक विमा तात्काळ देण्यात यावा. यासह मागील वर्षी गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. सोयाबीन कापसाच्या अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान मिळावे. व येलो मोझॅक व हूमनी आळीने नुकसान झालेल्या सोयाबीन पिक क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करावे.तसेच घरकुलधारकांना घरकुलाची उर्वरित रक्कम तात्काळ आदा करावी. दे. राजा व सिं.राजा ग्रामीण रस्ते विकास आराखडा मंजूर करावा.आणि दे राजा शहरातील मालमत्ता धारकांना पी. आर. कार्ड त्वरित वितरित करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला कार्याध्यक्ष गायत्री शिंगणे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे पाटील, राजेंद्र अंभोरे,किसान सभेचे शिवानाना शिंदे,अजबराव मुंढे,विजय खांडेभराड, जनार्दन मगर, अरुण मोगल, सुनील झोरे,सचिन कोल्हे, आरिफ पठाण, रावसाहेब गाढवे पाटील, ऋषी शिंगणे, विकास शिंगणे, विशाल बंगाळे, अक्षय दराडे,दत्तात्रय जायभाय, अविनाश कापसे यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.