बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहर पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी व पथकाने विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर शहर पोलीस ठाण्यात पारंपारिक पद्धतीने आज शस्त्र पूजन केले.
शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर अश्विन महिन्याती शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा अर्थात विजयादशमी साजरी केली जाते. यादिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला असल्याने या घटनेनंतर दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. हा वाईट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तीने मिळवलेला विजय समजला जातो. यासोबतच शस्त्रपूजन केले जाते. त्याप्रमाणे बुलढाणा पोलीस ठाण्यात पारंपरिक रीतीने शस्त्रपूजन करण्यात आले.
या विधीवत पुजेत शस्त्रांच्या प्रदर्शनात दारूगोळा सजवून सर्व शस्त्रांची पूजा करण्यात आली. यावेळी ठाणेदार नरेंद्र ठाकरेंसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
▪️म्हणून शस्त्रांची पूजा केली जाते..!
पुराणकथांनुसार, प्राचीन काळी महिषासूर नावाचा राक्षस होता. ज्याने देवतांना पराभूत केले होते. ज्याच्यामुळे सर्वच देव चिंतेत पडले होते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपल्या शक्तींपासून एक अनोखी शक्ती निर्माण केली. ज्या शक्तिचे नाव दुर्गा होते. देवतांनी आपल्याजवळील शस्त्र या शक्तिला देऊन तिला अधिकच शक्तिशाली बनवले. देवीने या सर्व शस्त्रअस्त्रांचा वापर करुन महिषासूराचा वध केला. या दिवसापासूनच अश्विन महिन्यातील दशमीला शस्त्रपूजन करण्यात येत आहे.अर्थात वाईट शक्तिवर चांगल्याचा विजय असल्याचे हे प्रतिक मानले जाते.