सैलानी (हॅलो बुलढाणा) आरोग्य हीच खरी संपत्ती! सुदृढ आरोग्यासाठी श्रीमंती असणे आवश्यक नाही त्यासाठी पाहिजे जिद्द व कष्टाची तयारी. ही कसरत केलीय जावेद शहाने ! बाबा सैलानी च्या आशीर्वादाने जावेद या फिटनेस गुरुने झोपडीच्या घरात राहून फिटनेसचे धडे देण्याचा धडका लावल्याने या फिटनेस गुरुचे 17 लाख फॉलोवर्स झालेत ही बाब नक्कीच प्रेरणादायक आहे .
बुलढाणा तालुक्यातील सैलानी गावातील झोपडीत राहणाऱ्या फिटनेस गुरू जावेदचे 17 लाख फॉलोवर्स झाल्याने भल्या भल्यांनी याचे आश्चर्य व्यक्त केले आहे.युट्यूब,इंस्टाग्रामवर हा गुरु फिटनेस चे धडे देतोय.Javed_fitness786 या नावाने इंस्टाग्राम अकाउंट वर 10 लाख फॉलोवर्स व
@Javedfitness786 या यूट्यूब अकाउंट वर 17 लाख या गुरुचे सब्सक्राइबर्स आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथे राहणारा जावेद शाह मूळचा अकोला जिल्ह्यातील आहे.
घरची परस्थिती हलाखीची असल्याने युवक आपल्या कुटुंबीयांसोबत टीनपत्राच्या रूम मध्ये भाड्याने राहतो.ग्रामीण भागात रोजगार म्हणून विशेष काही नसल्याने घरच्या चार पाच शेळ्यांची जंगलात चराई करणे व गावात मिळेल ते मोल मजुरीचे काम करणे अश्या संघर्षमय जीवनात
अनुकूल परस्थिती नसतांना फिटनेस ची आवड असलेल्या जावेदने ‘कोशिश करने की हार नही होती’ हे लक्षात ठेवले. जावेदची जिममध्ये फी देण्याची क्षमता नसल्याने जावेदने भंगार मधील टाकाऊ साहित्याच्या साह्याने आपल्या घरातील टिन पत्राच्या खोलीतच जिम तयार केला.
फिटनेसकडे लक्ष देत असतांना सोशल मीडिया द्वारे तरूणांना फिटनेसचे धडे देणे व त्यांना सुदृढ आरोग्याकडे आकर्षित करण्यासाठी जावेदने युट्यूब,इंस्टाग्राम वर फिटनेसचे धडे देत अनेकांना निरामय व सुदृढ आरोग्यासाठी शारीरिक कसरत करण्यास भाग पाडले आहे.














