बुलढाणा (हॅलो बुलढाणा/ खंडारे) या बातमीचा ‘मिरचीचा ठसका’ लागू देऊ नका, कारण बुलढाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातील गटातटात आणि विविध पक्षांमध्ये विधानसभेच्या तोंडावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाताहेत तर मुद्द्यावरची लढाई गुद्द्यावर आलीय.आजी-माजी आमदारांसाठी व निष्ठावंतांसाठी ही वर्चस्वाची लढाई ठरतेय.मात्र राजकीय कुरघोळीमुळे जनतेची मात्र कोंडी होतेय. कोणता नेता खरा आणि खोटा? हा संभ्रम निर्माण झाल्याची एकंदर परिस्थिती आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी घडताहेत.आजच सकाळी काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री ताई शेळके यांच्या पुढाकारातून होऊ घातलेल्या दिशा बचत गट फाउंडेशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बचत गट प्रदर्शनीचे लावण्यात आलेले प्रसिद्धी फलक अज्ञात इसमाने फाडल्याची घटना समोर आली आहे.अशी घटना काही नवीन नाही.थोडे मागे जाऊया….उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत प्रा.नरेंद्र खेडेकर यांची आयोजित बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सभा खुर्च्या फेकून उधळून लावण्यात आली होती.एका घटनेत माजी आमदार विजयराज शिंदे यांना मारहाण देखील झाली होती.तत्पूर्वी मुख्यमंत्री पुतळ्यांचे लोकार्पण करण्यासाठी आले असता,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या हातातील शेतकऱ्यांनी रक्तांनी लिहिलेले निवेदन फाडण्यात आले होते.तसेच काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची आंदोलन अनेक वेळा दडपण्यात आल्याचाही आरोप समर्थकांनी केला आहे.चिखली विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार श्वेता महाले यांचा भ्रष्टाचार काँग्रेसने उघडकीस आणण्याचा प्रयत्न केल्यावरून सध्याही आरोप प्रत्यारोप थांबताना दिसत नाही.पांदन रस्त्यात भ्रष्टाचार झाल्याचा शेतकरी व्हिडिओ व्हायरल करतात मात्र भाजपाकडून आरोपाचे खंडन केल्या जात असून आमच्याकडे पुरावे असल्याचे सांगण्यात येते. आरोप प्रत्यारोप तर मोजता येऊ नये इतके सध्या होताहेत. पत्रकारांना सुद्धा याचा टीआरपीसाठी फायदा होत असून त्यांची दमछाक होताना दिसून येते.असे चित्र बुलढाणा
जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात आहे.कुरघोडीच्या राजकारणाला उधाण आलयं. आपल्या पक्षाची सत्ता राज्यात यावी आणि आपल्याला आमदारकीचे पद मिळावं यासाठी मोठी कसरत सध्या सुरू आहे. एका अर्थाने राजकीय पक्ष म्हणजे दुकानदारी होऊन बसली आहे की काय?असे लोकांना वाटू लागले आहे.काळ जसजसा पुढे जात आहे, तसे चांगले माणसं राजकारणापासून दूर जाताना दिसत आहेत.आपले राज्य किंवा राष्ट्र यापेक्षा आपला पक्ष आणि मी असे समीकरण होऊन बसले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष हे जनसेवेपेक्षा ज्यांना पद आणि पैशांचा लोभ आहे, ज्यांना कुठलीही उलाढाल करण्यात काहीही गैर वाटत नाही, अशा लोकांसाठी आहेत की काय असे वाटते. लोकांची सेवा करायचीच असेल तर लोकप्रतिनिधीं मध्ये इतकी गळेकापू स्पर्धा कशासाठी असते, असा गोचीड प्रश्न मनामनामध्ये रुतलाय.सर्व लोक प्रतिनिधी जर एकमेकांना सहकार्य केले, तर अनेक विकास कामे वेळीच मार्गी लागतील.विकास वेग वाढेल. त्यामुळे सगळ्यांचाच फायदा होईल, पण एखाद्या कामाचे श्रेय आपल्या पक्षाला मिळावे आणि त्याचा निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी आटोकाट प्रयत्न केल्या जात असल्याचे दिसतेय.त्यामुळे मतदार राजा आता नक्कीच जागा होणार अशी अपेक्षा करूया !