बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मातृतिर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात अनेक जण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.
परंतु केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव निवडणूक मैदानात उतरल्याने व त्यांना मिळत असलेल्या युवाशक्तीमुळे ते बलाढ्य उमेदवार ठरून मैदान मारण्याची संभावना असल्याने आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना यंदाची विधानसभा निवडणूक जड जाऊ शकण्याची चिन्ह दिसून येत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुक उमेदवार कामाला लागलेत. परंतु पितृपक्षानंतर पक्षश्रेष्ठींच्या राजकीय खेळीला खरी सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणूक घोषित होण्यासाठी अद्याप अवधी बाकी आहे. अपवाद वगळता पक्षांनी जागावाटप देखील केलेल्या नाहीत.परंतु उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे वारी सुरु आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यांच्याकडे युवावर्ग आकर्षित होत असून मतदार संघ देखील युवा आमदाराच्या शोधात दिसत आहे.
महायुती मधील घटक असलेले आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ते महायुतीकडून
लढणार की महाविकास आघाडीकडून अथवा अपक्ष लढणार याबद्दलची चर्चा रंगत आहे. महायुतीकडून निवडणूक लढविली तर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर व माजी आमदार तोताराम कायंदे यांचे पुत्र डॉ. सुनील कायंदे व भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ यांना निवडणुकीत थोडी अडचण होणार आहे.शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून लढलेच तर मार्ग मोकळा होणार असलातरी ही जागा भाजप की शिंदे सेना लढविणार? हा प्रश्न आहे. शिवाय शरद पवार यांच्याकडे गायत्री शिंगणे उमेदवारीसाठी वारी करून आल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.