बिबि (हॅलो बुलढाणा/भागवत आठोले) इमानदार प्राणी म्हणून कुत्र्याची ओळख आहे.तो मालकाच्या मालमत्तेची प्रामाणिकपणे राखणदारी करतो.शेतात हा राखण्या अनोळखीला फिरकू देत नाही.पिकांना नुकसान पोहोचवणाऱ्या वन्य प्राण्यांना हुसकावून लावतो. मात्र खंडाळा येथील एका शेतकऱ्याच्या या राखणदाराचा शेतातच बिबट्याने फडशा पाडल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या या हल्लाबोल घटनेमुळे परिसरातील शेतकरी-शेतमजूर भयभित झाले असून सदर बिबट्याला पिंजराबंद करण्याची मागणी रेटण्यात आली आहे.
अलीकडे माणसांवर व पशुधनावर बिबट्यांचे हल्ले वाढीस लागले आहे.लोणार तालुक्यातील खंडाळा येथील ज्ञानदेव सखाराम दराडे यांच्यागट नंबर 230 व 232 मध्ये कपाशीची शेती आहे.पिकांचे वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी दराडे यांनी कुत्रा पाळला होता.परंतु या कुत्र्याला बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. दराडे शिवार फेरी मारण्यासाठी गेले असता बिबट आणि कुत्र्यांची जोरदार झटापट झाल्याचे विदारक दृश्य दिसून आले.कुत्र्याची शिकार बिबट्यानेच केल्याचे बिबट्याच्या चिखलातील पंजावरून दिसून येत आहे.संबंधित वनरक्षकांनी या घटनेचा पंचनामा करून वरिष्ठांना कळविल्याचे सांगितले आहे.एका महिन्यापूर्वी देखील एका बिबट्याने बकरीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. शिवाय बुलढाणा जिल्ह्यातील इतरही ठिकाणी बिबट हल्ल्याच्या घटना घडत आहेत.
तत्पूर्वीच गिरडा येथे एका शेतकऱ्याला बिबट्याने ठार केले तर मोताळा तालुक्यातील नळकुंड येथे एका हल्ल्यात शेतकरी जखमी झाला होता.अशा अनेक घटना उदाहरण म्हणून देता येईल. वनविभागाने गिरडा येथे बिबट्याची दहशत पाहून 7 बिबट्यांना पिंजऱ्यात कैद केले.आता लोणार तालुक्यातील खंडाळा,बीबी,किनगाव,चिखला येथील शेतकऱ्यांनी परिसरात असलेला बिबट पिंजराबंद करण्याची मागणी पुढे केली आहे.