बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव बँकेकडे पतसंस्थांच्या कोट्यावधीच्या ठेवी अडकलेल्या आहेत. या पतसंस्थांच्या ठेवी व वैयक्तिक ठेवीदारांच्या ठेवीच्या 50% रक्कम 15 ऑक्टोबर पूर्वी परत करणार असल्याचे आश्वासन मलकापूर अर्बन बँकेचे अवसायक डॉ.अशोक खरात यांनी दिले. मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक पतसंस्था ठेवीदार कृती समितीच्या वतीने दिनांक 16 सप्टेंबर रोजी मलकापूर अर्बन बँकेत गुंतवणूक केलेल्या पतसंस्थांच्या संचालकांची बैठक जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पतसंस्था फेडरेशनचे संचालक तथा बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक होते. तसेच या बैठकीला या कृती समितीचे अध्यक्ष डॉ.शांतीलाल सिंगी. पतसंस्था फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व मार्गदर्शक काकासाहेब कोयटे, समन्वयक सुदर्शन भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती .यावेळी डॉ. खरात म्हणाले की मलकापूर अर्बन बँकेत अनेक पतसंस्थांच्या ठेवी आहेत. या सर्व ठेवी शंभर टक्के देण्याचा माझा प्रयत्न असून त्यातील 50% रक्कम ही 15 ऑक्टोबर पूर्वी पतसंस्थांना परत करण्यात येईल तसेच बँकेचे कर्जदारांकडे असलेले कर्ज हे काही प्रमाणात पतसंस्थांकडे अधि ग्रहीत करण्याची परवानगी देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले .तसेच कृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या सर्व मागण्यांचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचा पतसंस्थांच्या संचालकांना दिलासा देण्यात आला. वैयक्तिक ठेवीदारांच्या सुद्धा 50% रकमा परत करण्यात येतील.. याप्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी पतसंस्था संचालकांसोबत पतसंस्थांच्या अडचणी व त्यावरील उपाय याबाबत चर्चा केली. या सर्व पतसंस्थांच्या पाठीशी फेडरेशन खंबीरपणे उभे राहून ठेवी परत मिळवण्यासाठी पुढेही पुढाकार घेत राहील या ठेवी मिळवण्यासाठी मागील तीन वर्षापासून करण्यात आलेल्या आंदोलनाची माहिती प्रास्ताविकातून डॉक्टर शांतीलाल सिंगी यांनी दिली. पतसंस्थाचे श्याम उमाळकर, राजाभाऊ देशमुख भोकरदनकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीला अँड व्हि.डी. पाटील, पप्पू सेठ हरलालका, रमेश शेठ माहिती पंडितराव देशमुख मदन गवते संदीप शेळके यासह जालना,परभणी,संभाजीनगर ,येथील पतसंस्थांचे अध्यक्ष व संचालक उपस्थित होते.या बैठकीचे संचालन सुदर्शन भालेराव तर आभार डॉ. शांतीलाल सिंगी यांनी मांनले.