बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 19 सप्टेंबरला बुलढाण्यात महापुरुषांच्या पुतळा अनावरणा निमित्त येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाप्रसंगी ‘पुतळा संस्कृती थांबवावी’ अशी मागणी करणार असल्याचे काँग्रेसचे वक्ता विभागाचे मुख्य समन्वयक रवी पाटील यांनी ‘हॅलो बुलढाणा’शी बोलताना सांगितले.
रवी पाटील म्हणाले की,महापुरुषांच्या पुतळ्यांमुळे जर कधी देशांमध्ये दंगली घडत असतील तर पुतळा संस्कृती संपुष्टात आली पाहिजे.त्यामुळे पोलिसांचा ताण वाढतो.निष्पाप लोकांचे बळी जातात.दंगलीमध्ये शासकीय मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते. लेकरं घरी सुखरूप पोहोचतील की नाही या चिंतेने पालक हैरान राहतात. पुतळ्यांच्या विटंबनेमुळे भारतात सर्वात जास्त दंगली घडलेल्या आहेत. आता हे थांबले पाहिजे.नुकताच शिवाजी महाराजांचा पुतळा खाली कोसळल्याची घटना घडली. आहे. परंतु या घटनेचा उहापोह अशा पद्धतीने करण्यात आला की जसे काही शिवाजी महाराज प्रत्यक्षात खाली पडले.महापुरुष हा कुठल्याही दगड मातीच्या पुतळ्यावर विसंबून राहू शकत नाही. महापुरुषांच्या आचार विचार डोक्यात घेण्याची गरज आहे. त्यामुळे पुतळा संस्कृती थांबवावी अशी विनंती मुख्यमंत्री यांच्या आगमन प्रसंगी करणार असल्याचे पाटील म्हणाले.