बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा अर्बनचा कार्यक्रम म्हटला की, त्या कार्यक्रमाला हमखास साद- प्रतिसाद मिळते. नियोजनबद्धता आणि कार्यक्रमाची संकल्पना हे त्याचे कारण आहे.सुर संगम ग्रुप व बुलढाणा अर्बन प्रस्तुत ‘रिमझिम सावन ने देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत चैतन्याने चिंब केले.
येथील बुलढाणा अर्बन व सुरसंगम ग्रुप च्या वतीने हिंदी व मराठी गीतांचा सुरेल नजराणा रिमझिम सावनचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 7:30 ला येथील गोवर्धन च्या सभागृहात एकापेक्षा एक सरस गीतांनी रसिक मन चिंब झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक व चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुकेशजी झंवर यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमात पावसावर आधारित विविध गीतांचा नजराणा खास प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात आला होता.रिमझिम सावन या कार्यक्रमात प्रामुख्याने अनंत देशपांडे यांचे मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले होते. सुरसंगमचे संगीत व्यवस्थापक जयगुरु यासह गायिका तनुश्री भालेराव,सिमा मोहोळ,गायक दिनकर पांडे, डॉ जितेंद्र राजकुमार, सुभाष साबळे, यांनी सुरेख सादरीकरण करून प्रेक्षकांनची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा नरेश राजपूत यांनी उत्कृष्टपणे सांभाळली. रिमझिम सावन या संपूर्ण कार्यक्रमात पावसावर आधारित विविध गीतांवर प्रेक्षक अक्षरशः थिरकले होते. सत्तर ते नव्वदच्या दशकातील पावसाच्या गीतांवर प्रेक्षक वर्ग हरखून गेला होता. अनंताभाऊ देशपांडे यांनी लता मंगेशकर यांचे मराठी व हिंदी गीताने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. दिनकर पांडे व सिमा मोहोळ यांचे युगल गीत रिमझिम के गीत सावन गाऐ…या गीताने प्रेक्षकांना वेड केले होते. तर सिमा मोहोळ यांनी हाय हाय ये मजबुरी..ये मौसम और ये दुरी हे गीत गाऊन तर प्रेक्षकांना चिंब भिजवले.रिमझीम गिरे सावन,अधीर मन झाले,इतनी हसीन इतनी जवाॅं रात क्या करे,घन ओथंबून येती व मी रात टाकली मी कात टाकली हे मराठी गीत अनंताभाऊ देशपांडे यांनी गाऊन प्रेक्षकांची वाहवा मिळविली. याशिवाय इतर मधुर गीत सादर करून रसिकांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या शेवटी आशा या चित्रपटातील आशाओं के सावन मे उमंगो की बहार मे या दिनकर पांडे व सिमला मोहोळ यांनी गायलेल्या गीताला वन्स मोअर करून रसिकांची मने जिंकली.या कार्यक्रमासाठी शहर व परिसरातील नागरिकांनी विशेष गर्दी केली होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरसंगम ग्रुप व बुलढाणा अर्बन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.