लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार)
विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर यांच्या वतीने लोणार येथील मंडळ अधिकारी यांनी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता न्यायिक मागण्यांसाठी तहसील कार्यालय येथे एकदिवसीय धरणे आंदोलन केले.
अमरावती मंडळ अंतर्गत येणाऱ्या मंडळ अधिकारी संवर्गाचे वेतन हे गेल्या २ वर्षापासून अनियमित होत आहे.शासनाच्या ध्येयधोरणानुसार महिन्याच्या ५ तारखेला वेतन मिळणे अवश्यक असताना दोन दोन महिने वेतन मिळत नाही. वेतन मिळालेच तर ते २५ तारखेपर्यंत दिले जाते त्यामधे पण काही तालुक्याला अनुदान दिले जाते व काहीना लवकर मिळेल असे सांगितले जाते. वेतनाच्या ह्या सततच्या अनियमिततामुळे मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांचे गृह कर्ज वाहन कर्ज एलआयसी हप्ते मुलांची शाळेची फी हे वेळेवर भरणे होत नसल्यामुळे बँकेचा दंड भरावा लागत असून सिबिल स्कोर खराब होऊन त्यांचे कामे खोळंबत आहेत.
वेळो वेळी वरिष्ठ पातळीवर निवेदन देऊन नेमकी अडचण काय आहे हे समजण्यास मार्ग नाही. त्यामुळे लवकरात लवकर समस्या सोडून मागण्या मान्य करून पगार नियमित करावा अशी मागणी एक दिवसीय धरणे आंदोलनातून मंडळ अधिकारी यांनी केली आहे.दरम्यान तहसीलदार रामप्रसाद डोळे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मंडळ अधिकारी यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी मंडळ अधिकारी संघटना जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सानप, विष्णू केंद्रे, शिवशंकर खारवाल,अनिल डव्हळे,जयदत्त येउल,लक्ष्मण चोले,तलाठी संघटनेचे अध्यक्ष जगण बारबुदे, तलाठी सचिन शेवाळे, तालुका वसुदेव जायभाये, दिगंबर गावंडे, राजेश भाकडे हे उपस्थित होते.