बुलढाणा (हॅलो बुलढाणा/प्रशांत खंडारे) आयुष्यातील येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची इच्छाशक्ती कमी पडल्यानंतर अनेक जण तणावग्रस्त होऊन मनोरुग्ण बनतात. मनोरुग्णालयात दाखल केल्यानंतर नातेवाईक असूनही अनेक वर्षे भेटण्यास येत नाहीत, तर कोणी आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना घेऊ जाऊ शकत नाहीत. अशा बेवारस मनोरुग्णांचा सांभाळ करणाऱ्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या मनोरुग्णांनी गणेश मुर्ती घडविल्या असून येथील गर्देवाचनालया जवळ मनोरुग्णांनी स्टॉल मांडला आहे.त्यामुळे गणेश मूर्ती विक्रीतून मनोरुग्णांना आयुष्यात स्वावलंबी बनण्याची संधी मिळणार आहे.
पळसखेड सपकाळ येथील सेवा संकल्प प्रतिष्ठान बेवारस मनोरुग्णांचा सांभाळ करीत आहे.संस्था अध्यक्ष नंदकुमार पालवे आणि आरती पालवे यांच्या देखरेखित सेवा संकल्प प्रतिष्ठान समाजाने झिडकारलेल्या मनोरुग्णांसाठी सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येऊन त्यांचे आयुष्य फुलविल्या जात आहे.मनोरुग्णालयात दीर्घकाळ उपचार केल्यानंतर रुग्ण बरे होतात. त्यांना रुग्णालयात राहून औषधोपचार करण्याची आवश्यकता नसते.परंतु बऱ्या झालेल्या रुग्णांचे नातेवाईक पुन्हा स्वीकारत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. तर अनेकांचे नातेवाईकच सापडत नाहीत.तर काही मनोरुग्ण समाजात दुःखी कष्टी जीवन कंठत वावरतात.अशा अनेक बेवारस रुग्णांना सेवा संकल्प प्रतिष्ठान मध्ये स्थान देण्यात आले आहे. नंदकुमार पालवे यांची ही समाजसेवा दखलपात्र ठरावी अशीच असून सेवा संकल्प प्रतिष्ठान मनोरुग्णांच्या बळकटीसाठी विविध अभिनव उपक्रम राबवीत असते.आजपासून गणेश उत्सव सुरू झाला असून, तत्पूर्वीच सेवा संकल्प प्रतिष्ठानातील मनोरुग्णांनी पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रींच्या मूर्ती घडविल्या आणि आज त्या बुलढाण्यात कॉलिटी हाऊस,
गर्दे वाचनालय जवळ स्टॉलवर विक्रीस मांडल्या आहेत. मनोरुग्णाना स्वावलंबी बनविण्याचे हे पाऊल प्रेरणादायी असून आपणही त्यांची गणेश मूर्ती खरेदी करून या उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.