मलकापूर (हॅलो बुलढाणा/करण झनके) महिलेच्या विनयभंग प्रकरणी एका आरोपीला येथील प्रथम वर्ग न्यायालयाने ३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ज्ञानदेव उर्फ खंडे महादेव धाडे रा. नरवेल असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, १४ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी अंदाजे ५.३० वाजताच्या सुमारास ज्ञानदेव उर्फ खंडे महादेव धाडे (रा. नरवेल) याने फिर्यादी महिलेस पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर ती ग्लास घरात ठेवण्यासाठी गेली असता आरोपीने तिच्या मागे घरात जाऊन दार बंद करून विनयभंग केला. ती जोराने आरडाओरड करून दार उघडून घराबाहेर आली. या प्रकरणी तक्रारी दिल्यावरून मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी ६/१९ प्रमाणे गुन्हा नोंदविला.आरोपी ज्ञानदेव धाडे याच्याविरुद्ध खटला चालवून या प्रकरणात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. अभिलेखावरील साक्षी पुरावा, कागदपत्रे व विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एस. एम आहेर यांनी ३ सप्टेंबर रोजी भा.दं.वि.चे कलम ३५४ ए या गुन्ह्यात आरोपीला तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ७ हजार रुपये दंड व भा.दं. वि.च्या कलम ४५२ या गुन्ह्यात ६ महिने साधा कारावास व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता कृष्णा वासुदेव गारमोडे यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन सिंह राजपूत यांनी केला. कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर काळे यांनी काम पाहिले.










