बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गणेश उत्सवाच्या काळात ‘लालपरी’ ची चाके थांबल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. कर्मचाऱ्यांनी न्यायिक मागणीपूर्तीसाठी संप पुकारला असून,काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई शेळके यांनी आज कर्मचाऱ्यांची भेट घेतली.चर्चेदरम्यान काँग्रेस आपल्या पाठीशी असून,आपल्या मागण्या शासन दरबारी रेटणार असल्याची खात्री पटवून देत ‘लालपरी’ च्या पंखामध्ये बळ भरले.
एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने 3 सप्टेंबरला बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आल्याने बुलढाणाबस स्थानकावर संपाच्या दुसऱ्या दिवशीही शुकशुकाट दिसून येत आहे.एसटी कामगारांचे वेतन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याएवढे करावे या प्रमुख मागणीसह इतरही मागण्या महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने रेटल्या आहेत. जीव धोक्यात घालून वाहक एसटी चालवितात.परंतु त्यांना दिले जाणारे वेतन हे कमी असल्याचे सांगण्यात येत असून 3 सप्टेंबर पासून एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.दरम्यान सण उत्सवाच्या काळात एसटी सेवा बंद झाल्याने चाकरमाने आणि प्रवाशांची मोठी गैरसोय दिसून येत आहे. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा येथे सुरू असलेल्या संपातील कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्यांची मागणी राज्य शासन तसेच केंद्र शासनापर्यंत पोहोचविणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली आहे.