मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ध्यानधारणेमागील वेगळं कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितलंय. काँग्रेसच्या अहवालानुसार विरोधकांना जास्त जागा मिळणार आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये इंडिया आघाडीला 86 जागा मिळण्याचा अंदाज अहवालात वर्तवण्यात आलाय.
त्याच धास्तीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणा करत असल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय, त्यावरून सत्ताधाऱ्यांनी नाना पटोलेंची चांगलीच खिल्ली उडवली आहे.
पंतप्रधानांनी कन्याकुमारीतील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानधारणा करायला सुरूवात केली आहे. गुरूवारी संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधानांनी ध्यान करायला सुरुवात केली. एकून 45 तास म्हणजेच 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यान करणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एकं नवं संशोधन केलंय. काँग्रेसच्या अहवालानुसार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळणार आहेत. आणि याच अहवालाच्या निष्कर्षामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ध्यानधारणा करण्याची वेळ आल्याचा अजब दावा नाना पटोलेंनी केलाय
काँग्रेसच्या अहवालात काय?
काँग्रेसच्या अहवालानुसार महाराष्ट्रात त्यांना 12, उत्तर प्रदेशमध्ये 16 तर बिहारमध्ये 9 जागा मिळतील, असा अंदाज आहे. याशिवाय इंडिया आघाडीला या तीन राज्यांमध्ये 86 जागा मिळतील, असा दावा काँग्रेसच्या अहवालात करण्यात आला आहे.
नाना पटोलेंनी केलेल्या या दाव्याचा सत्ताधाऱ्यांनी जोरदार समाचार घेतला. काँग्रेसला कुणी तरी खोटा अहवाल दिला असून त्याच्या आधारे नाना पटोले स्वप्नरंजन करत असल्याचा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला. निकालानंतर पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी काँग्रेसच्या सर्वच नेत्यांना ध्यानधारणा करावी, असा सल्लाही मुश्रीफ यांनी नाना पटोलेंना दिला.
पंतप्रधाना नरेंद्र मोदींच्या ध्यानधारणेचा काँग्रेसच्या अहवालासोबत संबंध जोडून नाना पटोलेंनी चांगलीच धमाल उडवून दिली. आता 4 जूनला निकालानंतर काँग्रेसचा अहवाल खरा होता की खोटा, हे उघड होईल. आणि त्यानंतर कुणावर ध्यानधारणा करण्याची वेळ येईल, हे ही स्पष्ट होईल.