चिखली (हॅलो बुलडाणा) मुळात घरकुला संबंधी काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या योजनांना अधिक चांगले स्वरूप देऊन त्यांची कार्यवाही चांगली करावी असा प्रयत्न सरकारने करायला हवा होता, परंतु काँग्रेस सरकारचे गरिबांचे कल्याण करणारे धोरण सोडून देऊन या सरकारने योजना व योजनाची कार्यवाही सुधारणे ऐवजी फक्त योजनाचे नाव बदलण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे दहा वर्षे सत्तेत असलेल्या भाजप सरकारने प्रचंड महागाई तर वाढवून दिली आहे परंतु या महागाईच्या अनुषंगाने घरकुल बांधणीसाठी मिळणारी रक्कम अजूनही रुपये एक लाख तीस हजार एवढीच ठेवली आहे तरी या रकमेमध्ये वाढ करून ती रक्कम तीन लाख रुपये करण्यात यावी या प्रमुख मागणीसह चिखली तालुका व शहर काँग्रेस कमिटी चिखली यांच्यातर्फे घरकुल संदर्भात पंचायत समितीवर एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्च्यामध्ये नवीन घरकुल मंजूर होऊन मिळण्यासाठी, मंजूर घरकुलांचे राहिलेले पैसे तत्काळ मिळण्यासाठी, महागाई गगनाला भिडलेली असताना एक लाख तीस हजारात घर कसे होणार तर त्या ऐवजी रुपये तीन लाख मिळायला हवे,या सर्व मागण्या करण्यात येणार आहेत.
तरी चिखली तालुक्यातील सर्व गोरगरिबांना हक्काचे घरकुल मिळण्यासाठी तसेच हक्काच्या घरकुलाचा वादा मोडणाऱ्या लबाड सरकारला जाब विचारण्यासाठी यलगार मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केले आहे.
या एल्गार मोर्चाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे हे करणार असून दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी बुधवारी सकाळी 11 वाजता पंचायत समिती कार्यालय चिखलीवर मोर्चा काढण्यासाठी विवेकानंद स्मारक बस स्टँड जवळ चिखली येथे जमा होण्याचे आवाहन राहुलभाऊ बोन्द्रे यांनी केले आहे.