चिखली (हॅलो बुलडाणा) दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी चिखलीमध्ये विदर्भातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले गेले.या दहीहंडीसाठी प्रमुख आकर्षण म्हणून त्यांनी सैराट फेम रिंकू राजगुरू व बॉलीवूड हिरोईन जरीन खान यांना आमंत्रित केले होते.
चिखली हे व्यापारी शहर आहे व जवळपासच्या शंभर गावांसाठी बाजारपेठ म्हणून चिखलीच उपलब्ध आहे.चिखली नगरपरिषद व विधानसभा दोन्ही भाजपा च्या ताब्यात असल्याने सर्वप्रथम स्त्रियांच्या आरोग्यासाठी आवश्यक स्वच्छतागृहांची येथे उभारणी करायला हवी होती.एवढ्या मोठ्या बाजारपेठेमध्ये किमान एका स्वच्छतागृहाची सुविधाही चिखली नगरपरिषद व लोकप्रतिनिधी उभारू शकले नाहीत, पुरुषांच ठीक आहे,त्यांना आय. टी. आय.,आणी अनेक लहान गल्ल्या केवळ आपल्या लाजेवर धार मारण्यासाठीच आहेत अस वाटत पण माय मावल्यान्च काय? आपल्या बेरोजगार पणावरून लक्ष वळवण्यासाठी दहीहंडी सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करतात का ? दहीहंडी सारखा धार्मिक कार्यक्रम त्याच्या प्रचारासाठी लाखो रुपये,नाचायला,गर्दी जमवायला ज्या नट्या आणल्या जातात त्यांना आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा त्या जनतेच्या पैशातून जनता माय माऊलीसाठी एक स्वच्छतागृह आपण बांधू शकत नाही? विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून तिचा राज्यभर प्रचार करतात,आता “सर्वात मोठी” म्हणजे वर “हंडी ऐवजी का ‘रांजण’ बांधणार आहेत का? दहीहंडी थोडी छोटी झाली तर चालणार नाही का? वाचलेल्या पैशातून जी माझी माय सोमवारच्या बाजाराला येते,तिच्यासाठी एखाद सुलभ स्वच्छतागृह बांधता येणार नाही का?
सर्वात मोठ्या दहीहंडीच भूषण एकच दिवस मिरवता येईल पण त्याऐवजी विदर्भातील सर्वात मोठे शेतकऱ्यांच्या मुलासाठी पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र का उभारत नाही?गरीब पण होतकरू मुलींसाठी विदर्भातील सर्वात मोठी व सुरक्षित अभ्यासिका का तयार करत नाही?
आणि अशा कार्यक्रमाला एखाद्या संत महात्मा किंवा श्रीकृष्ण चरित्र सांगणाऱ्या एखाद्या साध्वीला बोलावणे ऐवजी विविध चित्रपटामध्ये हावभाव करून लोकांना वाममर्गाला लावणाऱ्या नट्यांना का बोलावले जाते ? स्त्री देहाचा बाजार मांडून आपली तुंबडी भरणाऱ्या या नट्या यांना प्रमुख आकर्षण म्हणून दहीहंडीसारख्या धार्मिक कार्यक्रमाला बोलावणे किती योग्य आहे ? या दहीहंड्या भाजप सारख्या संस्कारी पक्षाने आयोजित करणे किती योग्य आहे?एकीकडे संत महात्मे आणि प्रभू श्रीरामासारख्या चारित्र्यवान लोकांच्या नावाने मते मागायची व दुसरीकडे दहीहंडीच्या नावावर मुंबईवरून नाचायला किंवा हात हलवायला यांना आणायच हे किती योग्य आहे?
विदर्भामध्ये “नागपूर नंतर चिखली” हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख शहर मानले जाते.आणि या शहरांमध्ये संस्कार कायम ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी या शहराचे वैभव कायम ठेवलेले होते परंतु चिखली शहरात मागील काही वर्षापासून दहीहंडीच्या नावावर होणाऱ्या या “फालतुगिरी” मुळे संघाचे नाक असलेली चिखली शहर व चिखली शहरातील संघ दोन्ही बदनाम होत आहेत.त्यामुळे संघ कमी पडतोय की संघाला डावलल जात आहे?असा प्रश्न सामान्य लोकांना पडत आहे.
तरी दहीहंडी सारख्या धार्मिक कार्यक्रमातून काहीतरी विधायक स्वरूपाच्या संदेश समाजात जायला हवा?की दहीहंडीला दुसऱ्या तमाशाचे रूप मिळेल याप्रकारे दहीहंडीचे आयोजन करावे?याचा विचार सुज्ञ लोकप्रतिनिधींनी करायला हवा.