बुलढाणा (हॅलो बुलढाणा/ प्रशांत खंडारे) ऐडीस एजिप्ती नावाचा डास जिल्ह्यावर घोंगावत असल्याने आठ महिन्यात 46 डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची प्रशासकीय नोंद आहे. डेंग्यूने साखरखेर्डात एका आठवड्यात दोन जणांचे बळी गेल्याचे वृत्त पसरल्याने जनता भयभीत झाली. डेंग्यू बरा होतो पण काळजी घेतली नाही तर धोक्याचं कारण देखील ठरू शकते.
जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर कोरड्या पावसाने डासांच्या उत्पत्तीसाठी आदर्श स्थिती निर्माण केली. त्यामुळे 1 जानेवारी 2024 पासून आज पर्यन्त बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यूचे 46, चिकनगुनिया चे 16 तर मलेरियाचा एक रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान जिल्हा हिवताप कार्यालय व आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी गीते यांना काय काय उपाय योजना केल्यात?अशी विचारणा केली असता त्यांनी हिवताप अधिकारी यांच्याकडे बोट दाखविले.हिवताप कार्यालयाचे कर्मचारी कार्यरत असून अनेक ठिकाणी औषध फवारणी व इतर उपाययोजना करण्यात येत आहेत.परंतु काही ठिकाणी ‘टायगर मॉस्क्युटो’ अर्थात ऐडिस एजिप्ती नावाचा डास डंख मारतोय! ‘हॅलो बुलढाणा’ने डेंग्यू विषयी माहिती जाणून घेतली असता, फ्लॅव्हिव्हायरस परिवारातील विषाणूमुळे होणारा डेंग्यू ताप हा एडिस एजिप्ती या प्रकारच्या डासाच्या मादीपासून फैलावतो. हा ‘टायगर माॅस्क्युटो’ घरात अंधाऱ्या जागी तसेच घराबाहेर थंड जागेतही वास्तव्य करतो.या डासांची उत्पत्ती साठवलेले स्वच्छ पाणी उदा. रांजण, हौद, पाण्याचे मोठे बॅरल, इमारतीवरील पाण्याच्या टाक्या, कुलर्स,कारंजी, फुलदाण्या इ. ठिकाणी होते.त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागाने केलेल्या जनजागृती नुसार योग्य काळजी घेण्याची गरज आहे.














