बुलढाणा (हॅलो बुलढाणा/प्रशांत खंडारे) ‘विघ्नहर्त्या’ तू 7 सप्टेंबरला येतोय.. ये..तुझ्या येण्याची आतुरता शिगेला पोहचलीच! पण येताना सांभाळून ये बरं का? कारण
सततच्या पावसाने रस्ते उखडल्याचे तुझ्यासह आमच्यावर ही ‘विघ्न’ आहे. तू ‘बुद्धीदेवता’ असला तरी, तुला रस्त्यावरील चिखल तूडवावाच लागेल कारण यंत्रणेला रस्ता दुरुस्तीची अजूनही ‘सद्बुद्धी’ आली नाही.
बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील महामार्ग व आंतररस्त्यांची अत्यंत बकाल अवस्था झाली आहे.त्यामुळे हे कसली स्मार्ट सिटी?असा प्रश्न पडतोय. पाऊस सुरू असल्याने डांबरी व कॉंक्रिट रस्ते उखडून 10 इंचापासून ते 4 फुटांपर्यंत खड्डे पडलेत.त्यामुळे जीव मुठीत घेऊन वाहने चालविण्याची कसरत सुरू आहे. कधी वाहन खड्ड्यातून उसळून नियंत्रण सुटेल व अपघात होईल याचा नेम नाही.अशा खड्डयामुळे चिखलमय रस्त्यावरून 7 सप्टेंबरला श्री गणेशाचे आगमन होणार आहे. त्यामुळे श्रीगणेशाच्या आगमनापूर्वी जिल्ह्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत,अशी अपेक्षा व्यक्त होतेय.गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना रस्त्यासंबंधित कोणत्याही समस्येला सामना करावा लागू नये. नागरिक, वाहनचालकांचा प्रवास सुखकर, विनाव्यत्यय होईल यादृष्टीने युद्ध पातळीवर कामे करून सर्व रस्त्यांची दुरूस्ती पूर्ण करावी,अशी मागणी गणेश भक्तांकडून उठत आहे.