बुलढाणा (हॅलो बुलडाणा / राजेंद्र घोराडे) बहीण-भावाचा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’ बहीण भावाच्या हाताला राखी बांधून रक्षा करण्याचे वचन भावाकडे मागते. हा साधासुधा दिसणारा दोरा बहीण भावाचे नाते अधिक घट्ट करणारा असतो. परंतु चिखली व बुलढाणा मतदार संघामध्ये कार्यरत भाऊंना आपल्या “ताईपासून” रक्षण व्हावे म्हणून मतदारसंघातील प्रत्येक घराची पायरी चढावी लागत आहे.या तायांपासून या निवडणुकीत आम्हाला वाचवा म्हणून “भाऊ” आर्जव करताना दिसत आहेत.
चिखलीच्या विद्यमान आमदार सौ श्वेताताई महाले या राहुल “भाऊला” आपल्या या रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून पुन्हा एकदा चिखली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व मागत असतील तर राहुलभाऊ बिचारे करतील तरी काय? भरीस भर महाविकास आघाडीतीलच डॉ. ज्योती खेडेकर यासुद्धा या रक्षाबंधनाला ओवाळणी म्हणून राहुलभाऊ,नरूभाऊ, आणी कपिलदादा यांना हा मतदारसंघ मागत आहेत! आता नाही श्वेताताईसाठी पण ज्योतिताईसाठी तरी या भावांनी मतदारसंघ सोडला पाहिजे,तशीही श्वेता ताईंच्या विरोधात आपली “लाडकी बहीण ज्योतीताई” यांना निवडून आणून या “भाऊंनी” आपल्या भावाची कर्तव्य पार पाडावीत असे “मोठ्या ताई रेखाताई” यांना सुद्धा वाटत असावे.
याच्या विरुद्ध अवस्था बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे या मतदारसंघांमध्ये “भाऊने” पाच वर्ष खुर्ची सांभाळली आता आपल्या ताईला पुढील पाच वर्ष खुर्ची हस्तांतरीत करावी असा हट्ट “जयश्रीताई” करीत आहेत.भाऊच्या मतदारसंघाची जबाबदारी मी घेते,भाऊंनी आमच्या भाचेबुवा व वहिनींना “हाताने” केक भरवून ,आपली “शिकारीची” हौस पूर्ण करण्याकरिता थोड थांबावं अशी मागणी जयश्रीताई करतच असतील.
तिकडे सिंदखेडराजा मतदारसंघात ,गायत्री शिंगणे व गौरव शिंगणे हे दोघे बहिण भाऊ आपल्या काकांची “नाईलाजाने” झालेली अवस्था पाहून…काका “नाईलाजापेक्षा निवृत्ती बरी” असा सल्ला देत रक्षाबंधन साजरे करीत आहेत, गौरव शिंगणे जरी “ताई तुला ओवाळणी म्हणून काकाकडून खुर्ची देतो” अस म्हणत असतील,तरी “काका आणी खुर्ची ये फेवीकॉल का जोड है,छुटेगा नही” अशी प्रचिती त्यांना येत आहे,आता खुर्चीपासून काकांना वेगळं करून गौरव आपली बहीण गायत्री हिला रक्षाबंधनाची ओवाळणी कशी देणार? हे पाहणे रंजक ठरेल.
थोडक्यात वरील काही बहिणींपासून भाऊंनाच धोका आहे त्यामुळे,आपल्या कर्तृत्वातून स्वतःला सिद्ध केलेल्या या बहिणींकडेचआपल्या मतदारसंघातील भावांच्या रक्षणाची जबाबदारी येते की काय? हे बघूया…
तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या ‘हॅलो बुलडाणा’ परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा!