देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) तालुक्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विविध कारणाने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले.अशा ई-पीक पाहणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत पाच हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची घोषणा सरकारने केली आहे. मात्र तांत्रिक कारणामुळे ई – पीक पाहणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांना देखील या योजनेद्वारे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी एका पत्राद्वारे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद आहे की, राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन दोन हेक्टर च्या मर्यादेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्याच्या अर्थसहाय्य योजनेची घोषणा सरकारने केली आहे. या योजनेचा लाभ गतवर्षीच्या खरीप हंगामात शासन नियमानुसार ई पीक पाहणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र आपत्ती काळामध्ये गतवर्षी इ पीक पाहणी नोंद करताना तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने अनेक शेतकरी ई पिक पाहणी नोंद करू शकले नाही. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ई पीक पाहणी नोंद करताना नेटवर्क उपलब्ध झाले नाही. तसेच ई-पीक पाहणी नोंदी बाबत बहुतांशी शेतकरी अज्ञानी असल्याने त्यांची ई -पिक पाहणी नोंद होऊ शकली नाही. असे असंख्य शेतकरी या अर्थसहाय्य योजनेच्या मदतीपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता एकही शेतकरी आर्थिक मदतीतपासून वंचित राहू नये,यासाठी अर्थसहाय्य योजनेच्या निर्णयात शिथिलता देऊन ई-पिक पाहणी नोंद न झालेल्या नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी केली आहे.