बुलढाणा (हॅलो बुलढाणा /प्रशांत खंडारे)नागपंचमीचा सण हिंदू संस्कृतीत अस्तित्व जपून आहे. नागपूजाचा सन्मान करणे संस्कृती शिकवते.परंतु या सणाच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यात विश्व अन्नदाता म्हणजेच आपला शेतकरी नागपंचमी साजरा करीत असताना,सावकरी सापांची वळवळ सुरू असल्याने पत्तेपंचमी देखील साजरी होत असल्याचे चित्र आज दिसून येत आहे.शेतकऱ्यांकडे पैसा नसला तरी सावकार त्यांच्याकडून कोणतीही वस्तू लिहून घेऊ त्यांना हार जित करण्यासाठी पैसे देऊन शेतकऱ्यांना बिनवर गुंगवत आहेत.
पवित्र श्रावणाचा महिना म्हणजे सणांची मांदियाळीच आहे! नागपूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपंचमी या सणाला अनन्य साधारण महत्त्व असले तरी काही कुप्रथाही अनेक वर्षापासून रूढ झाल्या आहेत. आषाढ महिन्यातील दीप अमावस्येला ‘गटारी अमावस्या’साजरी केल्यानंतर गावागावातील जुगारी नागपंचमीच्या दिवशी पत्ते पंचमी साजरी करीत दिवस-रात्र पत्त्यांच्या डावात लाखो रुपयांची उलाढाल करून कुणी कंगाल तर कुणी मालामाल होतात. पर्वणी ठरलेल्या पत्ते पंचमीला बुलढाणा शहरासह प्रत्येक गावात पत्त्यांचे मोठे डाव भरविले जातात. याची माहिती पोलिसांना असते.परंतु एक्का-बादशाह, तिर्रट असे पत्त्यांचे खेळामध्ये पैसे लावून हजारो रुपयांचा जुगार खेळला जातो.
ग्रामीण भागात दिवस उगवल्यापासूनच सर्रासपणे कोणाचीही भीती न बाळगता पत्त्यांचे डाव सुरू होते. शहरासह ग्रामीण भागात या दिवशी खेळल्या जाणाऱ्या जुगाराकडे पोलिसांचाही काना डोळा का असतो?हे सर्वांनाच माहित आहे.हे पोलीस अजगर म्हणून मिळाला तो पैसा गिळंकृत करतात असा आरोप आहे. नागपंचमीच्या दिवशी सुरू असलेल्या या पत्ते पंचमीच्या खेळात जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. दिवस आणि रात्रभर खेळल्या जाणाऱ्या या पत्त्यांच्या खेळात लाखो रुपयांची उलाढाल होते. ‘घरात नागपंचमी तर गावात सार्वजनिक पत्तेपंचमी’ साजरी होताना दिसून येत आहे. पत्त्यांच्या या खेळांमुळे तरुणपिढी व्यसनाधीन होऊन नादी लागत आहे. जुगाराच्या या खेळात अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.कारण सावकार शेतकऱ्यांची पूर्णता लूट करून घेतो.ती कशी करून घेतो हे प्रत्येकांना माहीत असेल!
ही प्रथा बंद करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.विशेष म्हणजे यात पैसे खाणारे पोलीस निलंबित झाले पाहिजे,अशी मागणी होत आहे.दरम्यान आज किती जुगारी?व अवैध सावकार पकडल्या जातात हा आकडा देखील पाहणे अत्यावश्यक ठरणार आहे.