बुलढाणा (हॅलो बुलढाणा/प्रशांत खंडारे) ‘बने चाहे दुश्मन जमाना हमारा .. सलामत रहे दोस्ताना हमारा’
वाचकांनों हे गीत आहे, खऱ्या मैत्रीचे! पण अलीकडे मैत्रीची पार व्याख्या बदलली.मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील मैत्रीवर दृष्टीक्षेप टाकला तर असे जाणवले की,’दोस्त दोस्त ना राहा..’ खरंच राजकारण एवढं बेक्कार असते का?विणलेले घट्ट मैत्रीचे धागे तटातट तुटायला वेळ लागत नाही.विद्यमान आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांची मैत्री सर्वश्रुत होती.आता त्यांची दुश्मनी ही सर्वश्रूत झाली आहे.
हेच काय धरून बसलात? अलीकडच्या काळात राजकारणात काही प्रमाणात विद्वेषाचे आणि एकमेकांना नखाने ओरबडण्याचे कार्यक्रम सुरू आहेत.त्याची उदाहरणे ही खूप आहेत.मैत्रीतील लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांची नावे प्रमुख आहेत. दोघेही शालेय जीवनापासूनच एकमेकांचे जीवलग मित्र होते. पण राजकारणाने दोघांना एकमेकांचे कट्टर विरोधक बनवले आहे.कवी कुमार विश्वास आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अण्णा आंदोलनाच्या काळापासून चांगले मित्र होते. आता दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत.सोनिया गांधी भारतात आल्या तेव्हा जया बच्चन यांच्या घरी राहायच्या. दोघींमध्ये घट्ट मैत्री होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबात दरी पडली. आज या दोघीही राजकारणात एकमेकींच्या कट्टर विरोधक आहेत.
खरे तर ‘राजकारणाच्या पलीकडची मैत्री’असायला हवी. हा महाराष्ट्राचा एक विशेष गुण. जिथे राजकीय मतभेद होतात, वेगवेगळे पक्ष असतात. आरोप-प्रत्यारोप होतात.मात्र हा अपवाद वगळायला हवा.एकेकाळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मित्र होते.ते आता वैरी दिसून येत आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे देखील वैरी झालेत.फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री झाली.डॉ. राजेंद्र शिंगणे आणि शरद पवार यांच्यातही दुरावा आला.सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय नेत्यांबरोबर त्यांचे समर्थकही एकमेकांवर टिका करताना दिसत आहेत. अनेकदा ओळखीच्या लोकांमध्ये राजकारणावरुन होणारी टिका खालच्या स्तराला जाते आणि नात्यांमध्ये वितुष्ट येते. एकाद्या राजकीय पक्षाची किंवा राजकीय नेत्याची बाजू घेण्यावरुन अनेकदा मित्रामित्रांमध्ये वाद होऊन कायमच दुरावा निर्माण होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे ‘मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखाच असायला पाहिजे!’